राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीमधील या बंडखोरीमुळे पक्षात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आता एकमेकांविरोधात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर ट्वीटद्वारे भाष्य केलं आहे. मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेना आपसात झुंजायला लावून विकृत आनंद घेतला. आता हाच प्रयोग राष्ट्रवादीच्या बाबतीच करणारी महाराष्ट्रातील एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी? असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे. रोहित पवारांचं हे ट्वीट सध्या चर्चेत असून त्यांचा बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी… मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी… आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?” रोहित पवारांचं हे ट्वीट सोशल मीडियात व्हायरल झालं असून यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.