राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली होती. संबंधित कंपनीतील दोन प्रकल्प बंद करण्याची सूचना प्रदूषण विभागाने दिली होती. रोहित पवारांच्या कारखान्यावरील कारवाईनंतर राज्यात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून माझ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप रोहित पवारांनी ‘एक्स’ अकाउंटद्वारे केला होता. यानंतर आता आणखी एक पोस्ट करत रोहित पवारांनी खळबळजनक दावा केला आहे.
रोहित पवार ‘एक्स’ खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती मजेशीर आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता. पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकून जरा आश्चर्यच वाटलं. केवळ राजकीय द्वेष या एकमेव कारणामुळं माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर याव्यतिरीक्तही अनेक कारणं आहेत.”
हेही वाचा- २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात शरद पवारांचा हात? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
“भविष्यात हा खटला लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनीशी लढेव. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,” असंही रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले. रोहित पवारांच्या या पोस्टनंतर त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.