Rohit Pawar On Aurangzeb Tomb: राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या विविध घडामोडींमुळे मुघल शासक औरंगजेब याची छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील कबर पाडण्याची मागणी जोर धरत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाजी कबर हटवण्याची मागणी केली आहे. जर ती पाडली नाही तर ‘बाबरीसारखी’ पुनरावृत्ती होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच भाजपाचे तेलंगनाचे आमदार टी. राजा सिंह यांनीही केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र लिहून कबरीच्या देखभालीसाठी देण्यात येणारा निधी थांबवून ती पाडण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित पवार यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित संघटना हा मुद्दा पुढे करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटेल आहे. “इतिहासाचे रक्षण केले पाहिजे जेणेकरून इथून पुढे २०० वर्षांनंतरही लोकांना हे लक्षात येईल की सत्ता कशी एका कबरीत गाढता येऊ शकते”, असे रोहित पवार म्हणाले.
भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी…
विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार म्हणाले, “सरकारचे तरुण, शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष नाही, त्यामुळे ते (बजरंग दल आणि संबंधित संघटना) लोकांचे लक्ष विचलित करण्याचा आणि सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी नेहमीच इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे.”
सत्ता एका कबरीत गाढता येऊ शकते
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले, “औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या राजवटीत स्वराज्याची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ शकला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनंतरही, शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित मावळ्यांनी औरंगजेबाला कोणतीही जमीन ताब्यात घेऊ दिली नाही. त्यामुळे त्याची कबर याचे प्रतीकात्मक संकेत आहे. इतिहासाचे रक्षण केले पाहिजे जेणेकरून इथून पुढे २०० वर्षांनंतरही लोकांना हे लक्षात येईल की सत्ता कशी एका कबरीत गाढता येऊ शकते.”
सुरक्षा व्यवस्था वाढवली
औरंगजेबाची कबर पाडण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथील कबरीजवळ सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. परिसरात अशांतता टाळण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत.
औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्यांची संख्या घटली
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत संरक्षित स्थळ असलेल्या या कबरीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. कबरीचे कामकाज पाहणारे फिरोज अहमद कबीर अहमद म्हणाले, “साधारणपणे दररोज सुमारे २,५००-३,००० पर्यटक कबरीला भेट द्यायचे, परंतु कबर पाडण्याची मागणी वाढल्यानंतर ही संख्या २००-४०० पर्यंत घसरली आहे.”