Rohit Pawar on Ajit Pawar Statement : अजित पवारांची खूर्ची स्थिर राहिली अन् माझी व देवेंद्र फडणवीसांची खुर्ची बदलली, असं मिश्किल वक्तव्य करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय आखाड्याता धुराळा उडवून दिला आहे. त्यावर अजित पवारांनीही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया देऊन चर्चेला नवा विषय मिळवून दिला आहे. दरम्यान, या अदलाबदलीच्या खुर्ची प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. तसंच, त्यांनी अजित पवारांना सूचक इशाराही दिला आहे. ते आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने विधानभवनात आले होते. त्यावेळी टीव्ही ९ ने त्यांच्याशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होतो तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होते. पण आता आमच्या खुर्च्या बदलल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची मात्र फिक्स आहे. माझे आणि देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबदलीचे ‘अंडरस्टँडिंग ’ असल्याचे शिंदे यांनी मिश्कीलपणे म्हणाले.
अजित पवारांचं प्रत्युत्तर काय?
“तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू”, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली.
रोहित पवारांची टीका काय?
“आता त्यांच्या खुर्चीची अदलाबदल झाल्याने देवेंद्र फडणवीसांचं एकनाथ शिंदेंकडे जास्त लक्ष आहे. कारण, वेगवेगळे भ्रष्टाचार, घोटाळे आणि गैरव्यवहार हे एकनाथ शिंदेंच्या खात्यातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे खुर्ची ज्याची बदलली त्याच्यावर लक्ष जास्त आहे. पण एकदा बदललेल्या खुर्चीवरचं लक्ष संपल्यानंतर त्यांचं लक्ष बाजूच्या खूर्चीवर जायला किती वेळ लागेल”, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला आहे.
आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी अधिकाधिक चांगल्याप्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करू.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 3, 2025
सरकार पाशवी बहुमतात मश्गूल असताना राज्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार, अगदी मंत्र्यांची मुलगीही सुरक्षित…
“ओबीसी नेत्या खडसे यांच्या मुलीवर चुकीच्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न झाला. अशा घटना घडत असताना, महाराष्ट्र अशांत असताना तुम्ही अशा कुडबुड्या करता, चेष्टा मस्करी करता हे लोकांना योग्य वाटत नाही. या गोष्टी मागे ठेवून सामान्य जनतेकडे लक्ष द्या”, अशी विनंतही त्यांनी केली.