राज्यात एकीकडे मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मु्द्दा तापलेला असताना राज्यातील इतर समस्याही दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात केलेली एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या संघर्ष यात्रेदरम्यान त्यांना आलेल्या एका अनुभवासंदर्भातली ही पोस्ट असून त्यासोबत रोहित पवार यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक विनंतीही केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेदरम्यानचा असून यादरम्यान रोहित पवार यांनी गेवराई तालुक्यातल्या जातेगावात एका वयोवृद्ध महिलेची भेट घेतल्याचा प्रसंग आहे. या वृद्ध महिलेने आपली व्यथा रोहित पवार यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण्याचं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं. तसेच, या महिलेच्या व्यथा सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) ही पोस्ट शेअर केली आहे. “आदरणीय मुख्यमंत्री साहेब. या आहेत गोदाबाई. युवा संघर्ष यात्रा गेवराई तालुक्यातल्या जातेगावातून जात असताना गोदाबाई यांची भेट झाली. त्यांच्या मुलाच्या ह्रदयाला छिद्र आहे. मुलावर शस्त्रक्रिया कशी करायची? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याचे घरदेखील पत्र्याचे आहे. पक्के घर नाही. गॅस आहे पण गॅस भरायला परवडत नाही. त्यामुळे,गॅस कोपऱ्यात फेकून चुलीवर स्वयंपाक करतात. टॉयलेट बांधला पण टाकी बांधली नाही. टॉयलेटचे अनुदान कोणीतरी परस्परच काढून नेले”, अशा शब्गांत रोहित पवार यांनी त्या महिलेच्या व्यथा पोस्टमध्ये मांडल्या आहेत.

“सर्वात दुःखद म्हणजे दूध घ्यायला परवडत नाही म्हणून त्या नातवंडांना बिना दुधाच्या चहामध्ये पाव भिजवून खायला देतात.या माउलीच्या अशा एक ना अनेक प्रश्नांनी माझ्यासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं”, असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“फडणवीसांनी भाषणाची स्क्रिप्ट दिली”, रोहित पवारांच्या आरोपावर भुजबळांचं उत्तर; म्हणाले, “पूर्वी शरद पवार…”

“प्रामाणिकपणा व संवेदना गरजेच्या”

“साहेब, शासन आपल्या दारीचे मोठमोठे कार्यक्रम, इव्हेंट करून योजनेत ‘आपल्या दारी’ नाव असलं म्हणजे शासन लोकांच्या दारी पोहोचत नसते. साहेब, व्यथा समजून घेण्यासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेणे अथवा साधा चमचा घेऊन जन्म घेणे याचा काही संबंध नसतो. लोकांच्या व्यथा समजण्यासाठी केवळ प्रामाणिकपणा आणि संवेदना गरजेच्या असतात. तो प्रामाणिकपणा आणि व्यथा आपल्याकडेदेखील असतीलच असे समजून गोदाबाईंच्या कुटुंबाच्या व्यथा आपण सोडवाव्यात ही विनंती करतो”, अशी विनंती रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar x post viral requests cm eknath shinde for help pmw
Show comments