छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी (२ एप्रिल) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सभेत महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आदी नेत्यांचा समावेश होता. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि भाजपावरही परखड शब्दांत हल्लाबोल केला.
या सभेनंतर दुसऱ्या दिवशी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी सभास्थळी जाऊन ‘मैदान शुद्धीकरण’ केलं. संबंधित कार्यकर्त्यांनी मैदानावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ज्या नेत्यांनी महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा अपमान केला, त्या नेत्यांवर या कार्यकर्त्यांनी बादलीभर गोमूत्र ओतायला हवं, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा- “…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकी
यावेळी रोहित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडेच महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेतून शेतकरी, कष्टकरी, युवा आणि महिला… अशा सर्व घटकांचे विषय मांडण्यात आले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुकोबाराया आणि श्री साईबाबा यांच्याबद्दल ज्या लोकांनी खालच्या पातळीवर वक्तव्यं केली, यांच्याविरोधात सभेमध्ये बोललं गेलं. यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडलं.”
“खरं तर, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, ते हेच कार्यकर्ते आहेत, ज्यांनी काल सभास्थळी गोमूत्र शिंपडलं. पण जेव्हा त्यांचे नेते, कार्यकर्ते जेव्हा अशा थोर महापुरुषांच्या विरोधात बोलत होते. तेव्हा ते शांत का बसले होते? असं असेल तर अशा नेत्यांवर गोमूत्राची आख्खी बादली ओतायची गरज होती. त्यामुळे बातम्यांमध्ये येण्यासाठी आणि वातावरण निर्माण करण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात. ते योग्य नाही. काही नेते, कार्यकर्ते जी दुटप्पी भूमिका घेतात, अशा गोष्टी कुठे ना कुठे थांबल्या पाहिजेत,” अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.