Rohit Pwar On Ashatai Pawar : राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय कटुता सर्वांना माहिती आहे. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर २०२४ मध्ये झालेली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे दुसून आले. पण सध्या पवार कुटुंबांनी एकत्र यावे यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. यादरम्यान पंढरपूर येथे पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुराया चरणी केली. यावर आता पवार कुटुंबातील सदस्य आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशाताई पवार यांनी विठुरायाकडे केलेल्या मागणीबद्दल रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना त्यांनी वैयक्तिक पातळीवर ही भावना सर्वांचीच असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “देवासमोर जाऊन मनातल्या गोष्टी बोलणं ही आपली परंपरा आहे. तिथे जाऊन त्यांच्या मनातील गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या. शेवटी त्या राजकारणात नाहीत, त्या समाजकारणामध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली ती व्यक्तिगत पातळीवर कुटुंब म्हणून आम्हा सगळ्यांचीच आहे”.

एकत्र येण्यासंबंधी निर्णय दोन्ही पक्षांचे प्रमुख घेतील असे सांगताना रोहित पवार पुढे म्हणाले की, “पण राजकारण जेव्हा पाहिलं जातं तेव्हा शेवटी त्या त्या पक्षाचे प्रमुख…आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत, पलिकडच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा>> शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार

सर्व पोलीस स्टेशनसाठी पलंग मागवा

बीडमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या पोलीस स्टेशनमध्ये पलंग मागवण्यात आल्याच्या मुद्द्यावर देखील रोहित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “त्या परिसरात मोठा असणारा व्यक्ती वाल्मिक कराड हे स्वइच्छेने पोलीसांसमोर आले, आणि त्यांना बीडमध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय. तेथे ते आले आणि अचानक त्या ठिकाणी पाच पलंग मागवण्यात आले. लोकांमध्ये चर्चा आहे की ते पलंग त्यांच्यासाठीच मागवण्यात आले. पण पोलिसांनी स्पष्टीकरण देताना प्रशासनाच्या अधिकार्‍यांसाठी ते मागवण्यात आल्याचे सांगितलं आहे. माझं म्हणणं आहे की फक्त एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, राज्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांसाठी पलंग मागवा. इतकंच नाही तर त्यासोबत एसी, चादरी, पांघरून, चांगल्या हाय क्वालिटीच्या गाद्या मागवायला काय हरकत आहे?” अशी मिश्किल टिप्पणी देखील रोहित पवार यांनी यावेळी बोलताना केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pwar on ashatai pawar demanding sharad pawar ajit pawar unity marathi news rak