वाई: चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या आगामी सिंघम थ्री या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वाईच्या गणपती मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आल्याने गणपती घाट उजळून निघाला आहे. या चित्रपटात अजय देवगन, करीना कपूर, अर्जुन कपूर आदींच्या मुख्य भूमिका आहेत. विद्युत रोषणाईने उजळलेला गणपती घाट पाहायला मोठी गर्दी होत आहे.
निसर्ग, मंदिरे आणि गडकिल्ल्यांसाठी ओळखले जाणारे वाई शहर व तालुका अलिकडच्या काही वर्षांपासून प्रसिद्धी झाल्याचा दावा बॉलीवूड, मराठी आणि भोजपुरी – २५० चित्रपट व मालिकांमधून दिसून आला आहे. अनेक मराठी, हिंदी, भोजपुरी चित्रपट मालिका, वेब सिरीज आणि जाहिरातींची चित्रीकरण सतत येथे सुरु असतात. छोटी मोठी जुन्या नव्या पद्धतीची गावे, तेथील बाजारपेठा, वाड्या-वस्त्या,जुन्या पद्धतीचे वाडे, घरे, गावे आदी लोकेशन येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील दिग्गज कलाकार, दिगदर्शक यांचा नित्य वावर येथे असतो. येथे गुंज उठी शहनाई, राम तेरी गंगा मैली, सरगम, चेन्नई एक्स्प्रेस, दबंग, सिंघम, इश्किया, ओंकारा, स्वदेश, गंगाजल, या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. या परिसरात अनेकांनी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.
हेही वाचा – वसंत मोरे यांची शरद पवारांशी भेट, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी मध्यस्थीची विनंती
चित्रीकरणासाठी कलाकार व यंत्रणांना मुंबई पुण्यापासून जवळचे ठिकाण म्हणून या परिसराला नेहमीच प्राधान्य दिले जाते. कृष्णा नदीच्या काठावरील निसर्गरम्य ठिकाण, डोंगर आणि उसाच्या शेतांनी नटलेले, शांततेच्या शोधात असलेल्या कोणालाही ते अधिक आकर्षक बनवते. चित्रीकरणामुळे खूप मोठी आर्थिक उलाढाल होते. हॉटेल व्यावसायिकांपासून अनेक व्यक्ती, कलाकार, गावांना रोजगार उपलब्ध होतो.
हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?
अनेक निर्माते या परीसरात चित्रीकरणाला प्राधान्य देत असतात. यापूर्वी रोहित शेट्टी यांच्या सिंघम या चित्रपटाचे चित्रीकरण वाई तालुक्याच्या धोम धरण परिसरात झालेले आहे. त्यांनी यावेळी पुन्हा सिंघम-थ्री या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वाईला प्राधान्य दिले आहे. सध्या गणपती घाटावर कोणताही उत्सव सुरू नाही, परंतु गणपती मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आल्याने गणपती घाट उजळून निघाला आहे. विद्युत रोषणाईने उजळलेला गणपती घाट पाहायला मोठी गर्दी होत आहे.