राज्य परिवहन महामंडळातील भरती प्रक्रियेबाबत अनेकवेळा आरोप होतात. तसे घडू नये, यासाठी एमकेसीएलमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतदेखील वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहक पदाची परीक्षा दिलेले उमेदवार आता एमकेसीएलच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत आहेत.
भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत एखादेवेळी चुकीचा किंवा अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असू शकतो. त्या वेळी उमेदवारास त्या प्रश्नाचे गुण बहाल केले जातात. राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक पदाच्या भरती प्रक्रियेत एमकेसीएलने वेगळाच गोंधळ निर्माण केला आहे. महामंडळातील वाहकाच्या ८ हजार ९४८ जागांसाठी एमकेसीएलमार्फत ४ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून ४ लाख ५० हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. ३० नोव्हेंबर रोजी याचा निकाल जाहीर करण्यात आला. पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी जाहीर करण्यात आली. यादी जाहीर केल्यानंतर प्रश्नपत्रिका ज्या नमुना उत्तर पत्रिकेवरून तपासण्यात आली आहे, त्या उत्तर पत्रिकेतच तीन चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रश्नपत्रिकेतील ११, ५४ आणि ६५ क्रमांकाच्या प्रश्नावर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर अत्यंत पारदर्शीपणे परीक्षा पद्धती घेण्याचा दावा करणाऱ्या एमकेसीएलने नवीन नमुना उत्तरपत्रिका (अॅन्सर की) तयार केली. पुन्हा नव्याने उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यात आला. नव्या निकालात आधीच्या यादीमध्ये पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांची नावे वगळलेली आहेत. यादीतून अचानक आपले नाव गायब झाल्याचे दिसल्यानंतर नोकरी मिळाली, या विश्वासात असलेल्या आनंदावर विरजण पडले आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या १३ जणांची नावे या प्रक्रियेमुळे अपात्र ठरली आहेत. तर त्यांच्या जागी पूर्वी अपात्र ठरलेले १३ नवीन उमेदवार पात्र ठरले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये अशीच अवस्था आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जीवन गोरे यांच्यासमोर २० हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीचे मोठे आव्हान होते. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी नावाजलेल्या एमकेसीएलमार्फत परीक्षा घेऊन देखील क ोठे माशी शिंकली, असा प्रश्न आता उमेदवार विचारू लागले आहेत.
दुरुस्ती करू -गोरे
नमुना उत्तर पत्रिकेमध्ये चूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यात तत्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांची नवीन यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पूर्ण झालेली यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत परीक्षेनंतर पहिल्यांदा गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहेत. त्यात एखाद्या उमेदवारापेक्षा कमी गुण असल्याचे निदर्शनास आल्यास महामंडळाकडे तक्रार नोंदवावी, त्याप्रमाणे दुरुस्ती करून यादी अंतिम केली जात असल्याचे रा. प. मंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी सांगितले.
‘एमकेसीएल’च्या परीक्षेत गोंधळ
राज्य परिवहन महामंडळातील भरती प्रक्रियेबाबत अनेकवेळा आरोप होतात. तसे घडू नये, यासाठी एमकेसीएलमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतदेखील वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहक पदाची परीक्षा दिलेले उमेदवार आता एमकेसीएलच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत आहेत.
First published on: 17-12-2012 at 01:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Row over mkcl exam