नांदेड : सामान्य भोजनात असतात, तितके पदार्थ सकाळच्या न्याहारीतच. त्यासोबत चहा आणि कॉफी. पिण्याच्या पाण्याच्या हजारो बाटल्या आणि सुमारे दोन हजार जणांसाठी शाकाहारी, पण अनेक पदार्थांची रेलचेल असलेले महागडे भोजन… असा शाही थाट भाजपाच्या येथील विभागीय बैठकीच्या निमित्ताने शुक्रवारी बघायला मिळाला!
दोन दशकांपूर्वी याच पक्षाने २००४च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी, मुंबईत सप्त तारांकित हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली होती. तेव्हा त्यावर जनसंघाचे संस्थापक सदस्य नानाजी देशमुख यांनी संबंधितांना खडे बोल सुनावले होते. पण आता केंद्रासह राज्यातही सत्तेवर असलेल्या आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा आधार घेणार्या या पक्षाने चव्हाणांच्या पक्षप्रवेशाच्या वर्षपूर्तीप्रसंगी झालेल्या बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना तारांकित संस्कृतीचा नमुना दाखविला.
मोठ्या उपस्थितीतील राजकीय बैठका किंवा मेळावा भरविण्यासाठी नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे आवडते ठिकाण म्हणजे, ‘भक्ती लॉन्स’ हे सुसज्ज मंगल कार्यालय. काँग्रेस पक्षाची धुरा वाहत असताना, चव्हाण यांनी या कार्यालयात अनेक कार्यक्रम पार पाडले. पण भाजपात प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी झालेली विभागीय बैठक प्रथमच त्यांच्या यजमानत्वात पार पडत असताना अन्य जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांना भपकेबाज आयोजन आणि खाण्या-पिण्याची बडदास्त अनुभवता आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान चव्हाणांचे शाही आदरातिथ्य काँग्रेसजनांनी पाहिले होते, तशीच शाही व्यवस्था भाजपाच्या बैठकीदरम्यान शुक्रवारी बघायला मिळाली. भाजपाच्या स्थानिक पूर्वाध्यक्षांनी पक्षाच्या कार्यक्रमांदरम्यान साधेपणा जपला होता. पण नांदेड भाजपाच्या चव्हाण पर्वात हा साधेपणा लुप्त झाल्याचे दिसले.
गुरूवारी सकाळपासून रात्रीपर्यंत ‘भक्ती लॉन्स’ परिसरात एका विवाह सोहळ्याची धामधूम होती, पण मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत, काही तासांतच तेथील नेपथ्यरचना पूर्णतः बदलली. सकाळी नऊनंतर या परिसरात भाजप नेत्यांच्या स्वागताचे वेगवेगळ्या आकारातील फलक आणि पक्षाचे झेंडे यांचेच साम्राज्य निर्माण झाले. या पक्षाकडून आमदार होण्यास इच्छुक असलेल्या अमर राजूरकर यांनी आयोजनात लक्षवेधी छाप पाडली. केवळ चार तासांच्या या बैठकीच्या खर्चाचा आकडा २५ लाखांच्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले.
भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले, तरी त्यांच्या कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर ह्या मात्र भाजपा महिला आघाडीमध्ये सक्रिय आहेत. बावनकुळे व अन्य नेत्यांच्या स्वागतासाठी भक्ती लॉन्स परिसरात त्यांनीही आपले काही फलक लावले होते. पण बैठकीच्या आयोजनावर वरचष्मा राखणार्यांनी प्रणिता देवरेंचे फलक हटविल्याचे सांगण्यात आले. बावनकुळे यांचे विमानतळावर आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागताचा मान चव्हाण कन्या आ.श्रीजया यांना देण्यात आला.