लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : आजपर्यंत अनेक विवाह सोहळे झाले, होतील. पण जर देव देवतेचा विवाह असेल तर… असाच एक विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर येथील श्री विठ्ठल रख्मिणीचा झाला, तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली.

वास्तविक पाहता शिशिर म्हणजे थंडी संपून वसंत म्हणजे उन्हाळा सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंतच्या आगमनाने सर्व सृष्टी फुलून जाते. सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार होते. आजचा दिवस रती आणि कामदेवाच्या पूजेचा असल्याचे मानल जाते. वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टीमध्ये चैतन्य असल्याचे हे प्रतीक आहे. या ऋतुमध्ये पांढरे वस्त्र परिधान केले तर उन्हाची तीव्रता कमी होते. अशा पद्धतीने रूढी बरोबर विज्ञानाची जोड पूर्वीपासून होते. असे असले तरी वारकरी सांप्रदायात अनेक परंपरा आजही जपल्या जात आहेत.

विठ्ठलाच्या रंगपंचमीस प्रारंभ

वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलास पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात येत असतो. या काळात दररोज गुलालांची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. वसंत पंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत म्हणजे एक महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरू राहणार. या रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभ वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला. सावळा विठूराया आणि रुक्मिनिमाता पांढऱ्या शुभ्र वेषात दिसणार आहे.

Story img Loader