जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध केला असताना आता रिपब्लिकन पक्ष त्या भागात प्रकल्प उभारण्याला विरोध करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये या संदर्भात करार केला असला तरी हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात यावा, अन्यथा देशभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला.
रिपब्लिकन पक्षाच्या विदर्भातील कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्ताने नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या सहकार्याने जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. मात्र, हा प्रकल्प जैतापूरमध्ये उभारण्यासाठी आमचा विरोध आहे. फ्रान्समधील आरिया कंपनीला या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी तोटय़ात असताना काम देण्यात आले. या अणुऊर्जाचा प्रकल्पाचा तेथील लोकांना फायदा होणार नाही. उलट त्यांचे नुकसान होणार आहे. अमेरिका, जपानसारख्या देशांनी प्रकल्प उभारण्याला विरोध केला आहे. भाजपचे नेते दिव. गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. राज्यात विजेचा असलेला तुटवडा बघता हा प्रकल्प उभारण्यास हरकत नसली तरी तो दुसरीकडे हलवावा, अशी मागणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आठवले म्हणाले.
राज्यात भूमिहिनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवली. त्यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. राज्यात ७ लाख १५ हजार ७३९ एकर तर विदर्भात १ लाख ३० हजार एकर जागा विकसित करण्यात आली नाही. राज्यात कोरडवाहू जमीन मोठय़ा प्रमाणात आहे. या जमिनीचा उद्योगांसाठी उपयोग करावा आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा. त्यावेळी भूदान कायदा करण्यात आला होता. त्यात केंद्र सरकारने बदल करावे, शेतकऱ्यांचे समाधान होईल आणि राज्यात उद्योग यावे यादृष्टीने सरकारने धोरण निश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी अनेकांना स्थानबद्ध करण्यात आले होते. मध्यप्रदेश सरकारने अशा स्थानबद्ध झालेल्या लोकांना १५ हजार रुपये निवृत्तवेतन देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात तीन हजारच्या जवळपास असे लोक आहेत त्यांना राज्य सरकारने निवृत्तीवेतन द्यावे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. गोहत्या बंदीबाबत बोलताना आठवले म्हणाले, या गोवंश हत्यामधील वंश हा शब्द वगळवा. यावेळी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्यासह रिपब्लिकन नेते उपस्थित होते. शरद पवारांनी दोन वषार्ंत सरकार पडेल असे भाकीत केले असल्याचे विचारले असता आठवले म्हणाले शिवसेना आणि भाजप युती पाच वषार्ंचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे.
सुलेखा कुंभारेंच्या कार्यक्रमावर टीका
एखाद्या कार्यक्रमात सर्व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणणे म्हणजे ऐक्य होत नाही असे सांगून आठवले यांनी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या कार्यक्रमावर टीका केली. ऐक्यासाठी रिपब्लिकन नेते एकत्र येण्यास काहीच अडचण नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. ही पक्षातील कार्यकर्त्यांची ओरड आहे. ऐक्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा आणि त्यासाठी सुज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी, एकदा ऐक्य झाले की ते तुटणार नाही, अशा पद्धतीने आराखडा तयार केला पाहिजे. देशात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी असून ती एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम नव्हे तर विचारमंथनाची आवश्यकता आहे.