भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करताना खालच्या भाषेचा वापर केला आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसते, तर अजित पवारांना सुंता करावा लागला असता, अशी अप्रत्यक्ष टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना तत्काळ समज द्यावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली. तसेच अजित पवारांवर टीका करताना पडळकरांनी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची टीकाही खरात यांनी केली. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.
हेही वाचा- भारताच्या अर्थसंकल्पावर तालिबान झाला खूश; नेमकं कारण काय?
संबंधित व्हिडीओत सचिन खरात म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर सतत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत असतात. गोपीचंद पडळकरांनी टीका करताना वापरलेली भाषा न शोभणारी आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना तत्काळ समज द्यावी, अशी मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (खरात) करत आहे.”
हेही वाचा- “…तर त्यांची सुंता”, अजित पवारांविषयी बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संभाजी महाराज धर्मवीर नसते तर ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ असं म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता झाली असती. त्यांना जर तसं वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या मित्रांना माझी विनंती आहे की, त्यांनी तिथे जाऊन खरी परिस्थिती काय आहे? हे तपासावं.” संभाजी महाराज धर्मवीर नसते तर अशी परिस्थिती झाली असती की नसती? हे मला सांगा, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी विचारला.