केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात रास्ता रोको करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा निषेध नोंदविण्यात आला. पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्ता रोको करण्यात आला. मुख्य चौकातील वाहतूक अडवल्याने याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, रामदास आठवले यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून त्याचा पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो. रामदास आठवले हे सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील हल्लेखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणीही धेंडे यांनी यावेळी केली. तर ‘मी लोकप्रिय नेता असल्याने कदाचित कोणीतरी एखाद्या मुद्द्यावरुन नाराज असेल त्यामुळे माझ्यावर हल्ला केला असावा, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. तर याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आठवले उपस्थित होते. रात्री १० वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर ते व्यासपीठावरून खाली येत असताना प्रवीण गोसावी या तरुणाने त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. या प्रकारानंतर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी गोसावीला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.