अडीच हजार वर्षांपूर्वी सर्व बौद्ध होते. नंतर देशात हिंदू धर्म येऊन लोक हिंदू झाले. हिंदू-मुस्लिम असा तेढ निर्माण करू नका. देशातील मुसलमानही बाहेरून आलेले नाहीत. तेही आधी हिंदू आणि तत्पूर्वी बौद्ध होते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
“देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे कोणी भोंगे काढण्याची, भोंगे वाजविण्याची विधाने करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. धर्माधर्मात तेढ निर्माण करू नये. भगवा रंग गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध आणि भगवा रंग शांततेचा आहे. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको,” असा सल्ला आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
भगवा रंग गौतम बुद्धांचा आहे, रामदास आठवलेंचं विधान; राज ठाकरेंना म्हणाले “बाळासाहेबांच्या तालमीत…”
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तर प्रदेशमधून विरोध होत आहे. भाजपच्या एका खासदाराने राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात आठवले यांनी राज यांच्या अयोध्या जाण्याला विरोध नाही, पण उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, असे सूचित केले. भोंग्याच्या मुद्यावरून आठवले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत. शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पक्ष असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंतच राहू, असे त्यांनी सांगितले.