देशाचा कारभार संविधानाने चालतो, त्यामुळे कोणी भोंगे काढण्याची, भोंगे वाजविण्याची विधाने करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. धर्माधर्मात तेढ निर्माण करू नये असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगवा रंग गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध आणि भगवा रंग शांततेचा आहे. राज ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको असंही ते म्हणाले आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तर प्रदेशमधून विरोध होत आहे. भाजपाच्या एका खासदाराने राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात आठवले यांनी राज यांच्या अयोध्या जाण्याला विरोध नाही, पण उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, असे सूचित केले. भोंग्याच्या मुद्यावरून आठवले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत. शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पक्ष असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंतच राहू, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi ramdas athavale says orange is gautam buddhas color advice raj thackeray sgy