मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन गोष्टींवरून सध्या जोरदार राजकारण सुरू असल्याचं महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केलं. ठाण्यातल्या उत्तर सभेत त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या नेहमीच्या सामन्यामध्ये मनसेची देखील जोरदार उडी झाली आहे. त्यात आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नवी मुंबईत माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांबाबतच्या भूमिकेलाही विरोध

याआधी देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून विरोध केला होता. “शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात”, असं रामदास आठवले म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज…”, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर ट्विटरवरून खोचक निशाणा!

“आपण काय बोलतोय याचं भान…!”

“माझं म्हणणं असं आहे की वाद निर्माण करणारी वक्तव्य कुणी करू नये. संविधानाच्या विरोधात कुणी भूमिका घेऊ नये. प्रत्येकाला घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे. कुणाचं तोंड आपण बंद करू शकत नाही. पण बोलत असताना आपण काय बोलतोय, याचं भान ठेवलं पाहिजे. परंपरागत पद्धतीने मशिदींवर भोंगे आहेत. मशिदीवर आहेत भोंगे म्हणून बाकीच्यांनी करू नयेत सोंगे. म्हणजे त्यांनी असं उलट-सुलट बोलून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केल्यानंतर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“दोन धर्मात युद्ध होईल असं…!”

“जर मंदिरावर कुणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, तर त्यावर बंदी असण्याचं कारण नाही. त्यांनी ते लावावेत. पण भोंगे काढावेत या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. अशी ताठर आणि चुकीची भूमिका घेण्याचा प्रयत्न मनसेनं करू नये. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. ते राजकीय नेते आहेत. ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते. हे खरं आहे. पण अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी करू नये. हिंदू धर्माच्या वाढीसाठी त्यांना काही करायचं असेल तर त्यांनी ते करावं. पण इतर धर्मावर आरोप-प्रत्यारोप करून दोन धर्मात युद्ध होईल किंवा वाद होईल असं वक्तव्य करू नये”, असं आठवले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi ramdas athavle on masjid loudspeaker hanuman chalisa mns raj thackeray pmw