आपल्या मिश्किल कवितांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वी केलेली एक मागणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मागणीवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजमती नालगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याला रामदास आठवलेंनी हजेरी लावली होती. यावेळी केलेल्या भाषणात रामदास आठवले यांनी ही मागणी केली असून त्यावर चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच, रामदास आठवले यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी देखील जागवल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आईचा दिवस तसाच वाईफ डे असावा”

“मदर्स डे आहे, आईचा दिवस आहे. पण जसा आईचा दिवस आहे, तसा वाईफ डे सुद्धा असायला हवा. आपल्या पत्नींचं आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं स्थान असतं. त्यांचं आपल्याला घडवण्यात फार मोठं योगदान असतं”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवलेंनी आईबद्दल जाग्या केल्या आठवणी…

दरम्यान, यावेळी बोलताना रामदास आठवलेंनी आपल्या आईविषयी आठवणी जाग्या केल्या आहेत. “मी ६ महिन्यांचा असताना माझे वडील मुंबईला होते, तेव्हा त्यांना अचानक ताप आला आणि त्यात ते वारले. माझे वडील गेले आणि माझी आई शेतावर काम करत राहिली. माझ्या मुलाने बाबासाहेबांसारखं शिकावं, मोठं व्हावं असं तिला वाटायचं. एक दिवसही शाळेत न गेलेल्या माझ्या आईला मुलानं शिकलं पाहिजे असंच नेहमी वाटायचं”, असं आठवले म्हणाले.

“मी काही नोकरीच्या मूडमध्ये नव्हतो”

दरम्यान, मी नोकरी करावी अशी आईची इच्छा असली, तरी मी काही नोकरी करण्याच्या मूडमध्यचे नव्हतो, असं आठवले म्हणाले. “मी मुंबईला गेल्यानंतर आईला वाटायचं की मी नोकरी केली पाहिजे. पण मी काय नोकरी करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. मी पूर्णवेळ माझ्या पद्धतीचं काम करत राहिलो. माझी आई माझ्या पाठिशी उभी राहिली”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi ramdas athawale on wife day remembers mothers day memory pmw