रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे त्यांच्या चारोळ्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राजकारण, समाजकारण, बॉलिवुड अशा कोणत्याही विषयावर अगदी काही क्षणांत रामदास आठवले चार ओळी तयार करु शकतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांमध्ये या चारोळ्यांची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यांच्या अशाच मिश्किल स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवलेंनी त्यांच्या तरुणपणाच्या काळात किंवा दलित पँथरच्या चळवळीत केलेलं आक्रमक काम सर्वश्रुत आहेच. पण जनसत्ताला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वत: त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी काही रंजक बाबी उघड केल्या आहेत.
रामदास आठवलेंनी या मुलाखतीमध्ये आपल्याला मोठा अभिनेता व्हायचं होतं, असं सांगितलं आहे. “मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला अभिनयाची आवड होती. तेव्हा काही नाटकांमध्ये मी काम केलं. दोन तीन चित्रपटांमध्येही मी छोट्या भूमिका केल्या होत्या. मोठा अभिनेता बनण्याची मला इच्छा होती. पण मी राजकारणात आलो, महाराष्ट्राचा मंत्री झालो. त्यामुळे चित्रपट किंवा अभिनयाकडे लक्ष द्यायची संधी मला मिळाली नाही. मला चित्रपटांचं आकर्षण आहे”, असं ते म्हणाले.
वेळ मिळाला तर बनवायचा आहे चित्रपट!
चित्रपटाची आवड असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं असतानाच वेळ मिळाला तर एखादा चित्रपट बनवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. “मला रिकामा वेळ मिळाला तर एखादा चित्रपट काढण्याचा माझा विचार आहे. भविष्यात मी त्याचा विचार करेन”, असं ते म्हणाले.
पत्नी सीमा आठवले यांच्याशी पहिली भेट!
दरम्यान, यावेळी रामदास आठवलेंना त्यांच्या आंतरजातीय विवाहाविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यावर मनमोकळेपणे प्रतिक्रिया दिली. “आम्ही एकमेकांना आधी पाहिलं होतं. माझी पत्नी सांगलीत राहात होती. मी मंत्री असताना तिथे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं होतं. त्यानंतर तिच्या लग्नाचा प्रस्ताव माझ्याकडे आला. मुलगी बीएससी झाली आहे वगैरे सांगण्यात आलं. आम्ही एकमेकांना पाहिलंच होतं. मग आमचा साखरपुडा झाला आणि आम्ही लग्न केलं”, असं रामदास आठवले म्हणाले.
Video: रामदास आठवलेंना ‘या’ मतदारसंघातून लढवायचीये लोकसभा निवडणूक; म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना…!”
“त्या ब्राह्मण आहेत. त्या लालबहादूर शास्त्री यांच्या नात्यामध्ये आहेत. त्यांचं कुटुंबं उत्तर प्रदेशच्या अलाहाबादचं आहे. ६०-७० साली ते सगळे महाराष्ट्रात आले. त्यांचं पूर्ण शिक्षण मराठीतून झालं आहे. पण मला लग्नानंतर हा अनुभव आला आहे की त्यांचे सगळे ब्राह्मण नातेवाईक आमच्या घरी येतात. त्यांना असं वाटत नाही की मी दलित आहे. मलाही असं वाटत नाही की ते कुणी दुसरे लोक आहेत. त्यामुळे आंतरजातीय लग्नांमुळे समाजात एकता निर्माण होऊ शकते”, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
“बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं होतं की त्यांचा ब्राह्मण समाजाला विरोध नसून ब्राह्मण्यवादाला आहे. चातुर्वर्ण्याला आहे. जातीवादाला आहे. कोणत्या जातीच्या व्यक्तीचा मी विरोध करत नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. त्यांच्या पत्नी माई आंबेडकर ब्राह्मण होत्या”, असं त्यांनी नमूद केलं.