शिवसेना , भाजप आणि रिपाई या महायुतीत रिपाईला लोकसभेच्या किमान चार आणि विधानसभेच्या किमान ३२ जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्या कोणत्या राहतील हे देखील महायुतीने तातडीने स्पष्ट केले पाहिजे. जेणेकरून मिशन २०१४ साठी तयारी करणे सोपे जाईल, अशी अपेक्षा महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये काही मुद्दय़ावर मतभेद अवश्य आहेत पण ‘मिशन २०१४’ चे लक्ष गाठण्यासाठी हे मतभेद बाजुला सारून आम्ही एकसंघपणे लढणार आहोत. विदर्भात विधानसभेच्या किमान १० जागा रिपाइंला मिळाल्या पाहिजे. साधारणत: प्रत्येक जिल्हय़ात एकतरी उमेदवार या महायुतीमध्ये रिपाइंचा असावा, अशी आमची मागणी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यावर टीका करताना आठवले म्हणाले, हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करतात. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी स्वबळावर लढून दाखवावे.
विदर्भावर होत असलेल्या अन्यायाची कबुली देऊन आठवले म्हणाले, महायुतीची सत्ता आल्यास विदर्भावर होणारा अन्याय आम्ही दूर करू. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करताना आठवले म्हणाले, बलात्कारी व्यक्तींना फाशी द्यायची वा नाही याबाबत न्यायालय निर्णय घेईल मात्र अशा व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार टाकणे हा एक उपाय आहे. राज्यात अद्यापही महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारजवळ या पदावर नेमण्यासाठी महिलांची उणिव असेल तर आम्ही आघाडी सरकारला महिला उपलब्ध करून देऊ, असेही आठवले म्हणाले. राज्यात दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर आहे. पाणी टंचाई आणि गुरा ढोरांसाठी चाऱ्याची देखील टंचाई निर्माण झालेली आहे. या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली.
पत्रकार परिषदेला खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड, माजी आमदार अनिल गुंडाणे , रिपाईचे राज्यसचिव भुपेश थुलकर, सुधाकर तायडे, मोहन भोयर, गोिवद मेश्राम, नवनीत महाजन, बापूराव धुले आदी हजर होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा