तासगावमध्ये आर. आर. आबांचा फोटो आणि इस्लामपुरात वसंतदादांचे नाव बदलण्याच्या घटनेवरून राजकीय संघर्ष सध्या सुरू आहे. तासगावमध्ये आबांचा फोटो जाऊन खा. संजयकाका पाटील यांचा फोटो लावल्यावरून राष्ट्रवादीत असंतोष पसरला असून इस्लामपुरात दादांच्या नावाऐवजी राजारामबापूंचे नाव सभागृहाला दिल्यावरून राजकीय घमासान सुरू आहे.
तासगाव नगरपालिकेतील सभागृहात नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती त्या वेळी आबांचा फोटो लावण्यात आला होता. गेली सुमारे २५ वष्रे याठिकाणी आबांचा फोटो नगराध्यक्षांच्या दालनात होता. बदलत्या राजकीय स्थितीत नगरपालिकेत १९ सदस्यांपकी १४ सदस्य भाजपाचे खासदार गटात सहभागी झाल्याने नगराध्यक्षांच्या खुर्चीमागे असलेल्या आबांच्या फोटोची अडचण होऊ लागली. नगराध्यक्षा श्रीमती सुशीला साळुंखे यांनी आपल्या आसनामागे असलेला आबांचा फोटो तत्परतेने काढून आपल्या निष्ठा कोणाशी आहेत हे प्रदíशत केले आहे. याबद्दल राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली असून आ. सुमनताई पाटील यांनी या पध्दतीने आबांचे विचार संपणार नसल्याचे सांगत राजकीय संघर्ष कायम राहील याची ग्वाही दिली आहे.
इस्लामपूर पंचायत समितीचे नूतनीकरण झाल्यानंतर सभागृहाला असलेले वसंतदादांचे नाव बदलण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे. मात्र, हे नामकरण विधिवत न करता बहुमताच्या जोरावर करण्यात आल्याचा आक्षेप काँग्रेसच्या सदस्यांनी घेतला असून याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक यांच्यासह सर्वच पक्ष नामकरणासाठी एकत्र आले असून यासाठी ६ नोव्हेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आ. जयंत पाटील यांच्या गटाला विरोध करण्यासाठी हे सर्व जण एकत्र येत असून केवळ नावासाठी राजकीय संघर्ष सुरू आहे.