कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. मग कांदा जीवनावश्यक वस्तूत का टाकला, असा प्रश्न उपस्थित करत सर्व शेतमालाचे भाव गडगडण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री आमदार आर. आर. पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार कूचकामी ठरल्यास हाच कांदा, टोमॅटोचा मार खाण्याची वेळ या सरकारवर येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
दिंडोरी येथील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली.
त्याप्रसंगी ते बोलत होते. कर्जबाजारी कादवा कारखाना नफ्यात आणून सहकाराची पणती श्रीराम शेटे यांच्या संचालक मंडळाने तेवत ठेवली असून त्याचा आदर्श इतर संस्था चालकांनी घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी स्वामी समर्थ सेवामार्गाचे अण्णासाहेब मोरे, कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, सचिव बाळासाहेब उगले हेही उपस्थित होते.
साखर कारखाने केवळ साखर तयार करत नाहीत. तर, पूरक उत्पादने, शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळवून देतात. त्यामुळे हे कारखाने जिवंत राहिले पाहिजेत. स्वामिभानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे नाव न घेता शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांच्या घरावर मोर्चा नेऊन शेतकऱ्यांचा कळवळा आणणारे आता शांत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आ. नरहरी झिरवाळ यांचेही भाषण झाले.

Story img Loader