अहिल्यानगरःशहरातील लालटाकी रस्त्यावर, सध्याच्या पोलीस मुख्यालयाच्या जागेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ३२० सदनिकांची वसाहत उभारली जाणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही वसाहत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत होणार आहे. त्याचा कार्यारंभ आदेशही महामंडळाने काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार संग्राम जगताप यांनी ही माहिती दिली. पोलिस मुख्यालयातील सध्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार जगताप यांनी सन २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मागणी करत प्रस्ताव दाखल केला होता. तसेच विधानभवनात तारांकित प्रश्न उपस्थित करत राज्य शासनाकडे सतत पाठपुरावाही केला.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने अहिल्यानगर शहरातील लालटाकी-सर्जेपुरा दरम्यान असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे ३२० सदनिकांची इमारत बांधण्यासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

या कामाच्या मंजुरीचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरच नवे घरे मिळतील, असे त्यांनी सांगितले. अहिल्यानगर शहरातील लालटाकी- सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस मुख्यालय येथील सध्या असलेली घरे पाडून तेथे नवे बहुमजली इमारती उभारून ५०० चौरस फुटांच्या, ३२० टू बीएकके सदनिका बांधण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची टाकी, अंतर्गत पथदिवे व प्रशासकीय कार्यालयही उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात  आला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नव्या मुख्यालयास निधी व कार्यारंभ आदेश काढण्यात आला आहे. लवकरच प्रत्यक्षात कामास सुरवातही होणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.