सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखभाल दुरुस्ती, खरेदीमध्ये ४ कोटी १८ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला असून चौकशी अधिकारी उपनिबंधक मनोहर माळी यांनी तत्कालीन संचालकांवर ठपका ठेवणारा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. बॅंकेच्या २००१ ते १२ या काळात हा गैरव्यवहार झाला असून चौकशी करण्यात आलेल्या १५ पकी १० प्रकरणांमध्ये गैरव्यवहार आढळून आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ २०१२ मध्ये राज्य शासनाने बरखास्त करून प्रशासक म्हणून शैलेश कोतमिरे यांची नियुक्ती केली आहे. सध्या बँकेचा कारभार प्रशासक पाहात आहेत. संशयास्पद वाटणाऱ्या १५ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिरजेतील उपनिबंधक मनोहर माळी यांना सहकार निबंधक कोल्हापूर यांनी नियुक्त केले होते.
माळी यांनी उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून १० प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तत्कालीन संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामध्ये कोणकोणते दोष आढळून आले याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. १० प्रकरणात ४ कोटी १८ लाखाचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून तसे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य कार्यालयाची दुरुस्ती व रंगरगोटी करणे, सावळज शाखा बांधकाम, आटपाडी मार्केट शाखा बांधकाम, बँक गॅरंटी शुल्क परतीचा व्यवहार, वाळवा बचत गट सहायता संघाला मानधन, निवृत्तीनंतर नियुक्ती, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी, जादा दराने सुरक्षा अलार्म खरेदी, एकरकमी कर्जफेड योजनेत सूट, संगणक खरेदी आदी प्रकरणात हा गैरव्यवहार आढळून आला आहे.
तसेच बँकेने नोकरभरती करीत असताना ३५ लेखनिक आणि ६० शिपाई भरती करीत असताना नियमबाह्य निर्णय घेण्यात आल्याचा आक्षेप अहवालात नोंदविण्यात आला आहे. ही भरती प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवाल सहकार कायदा कलमान्वये असला तरी यात केवळ चौकशी अंतर्भूत आहे. मात्र सहकार निबंधक या चौकशीवरून कलम ८८ अन्वये झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देउ शकतात. यापूर्वी बँकेच्या १५३ कोटीच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या तत्कालीन ६३ संचालकांची चौकशी सुरू असून ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले असले तरी ठपका ठेवण्यात आलेल्यापकी कांही संचालक आता भाजपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी आता शासन काय निर्णय घेणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्हा बँकेत सव्वाचार कोटींचा गैरव्यवहार
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखभाल दुरुस्ती, खरेदीमध्ये ४ कोटी १८ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला असून चौकशी अधिकारी उपनिबंधक मनोहर माळी यांनी तत्कालीन संचालकांवर ठपका ठेवणारा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.
First published on: 26-11-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 4 crore scam in sangli jilha bank