मागील काही दिवसांपासून राज्याच्या सरकारमधील दोन अपक्ष आमदारांमध्ये खोक्यांवरून वाद सुरु आहे. आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. तसेच, एक तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावे, अशी मुदतही बच्चू कडू यांनी दिली होती. त्यात रवी राणांवर ५० कोटींचा दावा ठोकणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “रवी राणांना मी चोर म्हटलं नाही. स्वत:ला लपण्यासाठी आईला समोर आणण्याचा प्रयत्न रवी राणांकडून केला जात आहे. अशा पद्धतीने वातावरण तयार करण्यात येत असेल, तर रवी राणांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आईला समोर करून अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण करण्याची प्रथा थांबवली पाहिजे. तसेच, लवकरच रवी राणांवर ५० कोटींचा दावा ठोकणार आहे,” असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान, रवी राणा यांच्यावर आरोप करता बच्चू कडू यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांवर टीका करताना महिलांबाबत तसेच तृतीय पंथियांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी अमरावतीत बच्चू कडू यांच्याविरोधात महिला मुक्ती मोर्चाने गुन्हा दाखला केला आहे. त्यामुळे आगामी बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.