लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फारसं यश मिळवता आलं नाही. ४८ मतदारसंघापैकी महायुतीला फक्त १७ जागा निवडणून आणण्यात यश आलं. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रासपचे नेते महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सभाही घेतल्या होत्या. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्यांनी महादेव जानकरांचा पराभव केला.
यानंतर आता रासपचे नेते महादेव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघामधून लढवणार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. “मी डेफिनेटली खासदार होणार, बारामतीसाठी माझी तयारीही सुरु आहे”, असं महादेव जानकर यांनी अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा : “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी…”, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांचा मोठा दावा
महादेव जानकर काय म्हणाले?
“आता पुढच्या निवडणुकीसाठी माझी बारामतीसाठी तयारी चालली आहे. बारामती मतदारसंघातूनच पुढचा निकाल लागणार आहे. मी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो. नांदेड, सांगली, माढा, बारामती आणि परभणी या मतदारसंघातून लोकसभा लढलो. मात्र, पाचही ठिकाणी माझा पराभव झाला. पण माझं मतदान लाखांनी वाढत चाललं आहे. कमी होत नाही. माझा रनरेट वाढत चालला आहे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
जानकर पुढं म्हणाले, “पक्षालाही (रासप) मान्यता मिळत चालली आहे. आज आपल्या पक्षाचा विधानसभेत आमदार आहे. विधानपरिषदेत आमदार आहे. विदर्भात आम्ही कमी आहोत. मात्र, विदर्भातील वर्धा आणि गडचीरोलीमध्ये काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. वर्ध्यामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य तर गडचीरोलीमध्ये ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. अमरावती, अकोला असेल किंवा वाशिम आणि बुलढाणा या ठिकाणी आपण शून्य आहोत. लोणारमध्ये एक नगरपालिका लढवली होती. पण तेथे यश मिळालं नाही”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.