राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने हिंदू-मुस्लिम यांच्यातला वाद आणि तिरस्कार अंतिम टोकावर आणला आहे तो वाढवण्याची जागा नाही. त्यामुळे तिरस्कार हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ओबीसी आणि मराठा यांच्यात आता आरक्षणाच्या नावाने भांडणं लावली आहेत. द्वेष आणि मत्सर या दोन्ही समाजांमध्ये पसरताना वाढताना दिसतो आहे. आम्ही आता हा मत्सर वाढणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. मी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांच्याशीही चर्चा करतो आहेच. माझ्याकडे असलेला फॉर्म्युला मी निवडणुकीनंतरच त्यांना देणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात आणखी धार्मिकता येईल असं वाटत नाही

देशातलं वातावरण राम मंदिरामुळे धार्मिक झालेलं आहेच. पण अजून धार्मिकता येईल असं वाटत नाही. मात्र यातला एक प्लस पॉईंट दिसतोय तो म्हणजे सत्ता आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे दिसायला लागलं आहे. लोकांना हे कळू लागलं आहे. देवळातली मूर्ती पूजा ही व्यक्तिगत स्वरुपाची आहे, भावनेशी संबंधित आहे. तर संसदेतील सत्ता ही लोकांशी संबंधित आहे, नोकऱ्या देणारी आहे. लोकांमध्ये दोन मतं स्पष्ट होत आहेत हे चांगलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “बाळासाहेब लोकांच्या गराड्यात असायचे, भेट व्हायची नाही..”, कशी आहे प्रकाश आणि अंजली आंबेडकरांची लव्हस्टोरी?

वंचितचा फॉर्म्युला मान्य नसेल तर मविआने फॉर्म्युला द्यावा

वंचितचा फॉर्म्युला महाविकास आघाडीला मान्य आहे का? हे सोनिया गांधी, शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे. तसं नसेल तर त्यांच्या फॉर्म्युला काय तो विचारला पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अडीच वर्षापासून महाविकास आघाडी सत्तेबाहेर आहे. आत्तापर्यंत ४० वेळा तरी बैठका झाल्या, पण त्यातून ४८ जागांचं वाटप जेव्हा होत नाही तेव्हा वेगळ्या चर्चा सुरु होतात असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

….तर आम्ही २४-२४ जागा लढवणार

शरद पवार यांना मी उघडपणे पत्र दिलं आहे. त्यात गुप्त काहीही नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी आमचं असं ठरलं आहे की त्यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी काही जमलं नाही तर आम्ही दोघांनी निवडणूक लढवायची असेल तर आम्ही २४-२४ जागा लढवू हे ठरलं आहे. आता महाविकास आघाडीचं काय ते तिघांपैकीच कुणीतरी सांगू शकेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा इंडिया आघाडीतला महत्त्वाचा पक्ष आहे. त्यांनी पक्ष वाढवायचा की मोदी आणि भाजपाचं सरकार घालवायचं याचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही. तो निर्णय त्यांनी घेतला तर बाकीच्या गोष्टी आपोआप सुरळीत होतील असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजकीय पक्षाने सरंजामशाही भूमिका घेऊ नये. त्यांनी निवडणूक लढवावी, जे काही होईल जय किंवा पराजय त्याला सामोरं जावं. जमलं तर जमलं नाही जमलं तर सोडून द्यायचं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नावर भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss and bjp have brought the hindu muslim dispute to the extreme said prakash ambedkar scj
Show comments