संघ परिवार आणि भाजपच्या आक्रमक वाचाळ नेत्यांना आणि त्यांच्या वादग्रस्त नेत्यांनाही रोखण्यात संघ व भाजपचे नेतृत्व कमी पडल्याने पक्षाला दिल्लीत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला, अशी भावना आता संघ परिवारात व्यक्त होऊ लागली आहे. मोदींच्या विकासवादी भूमिकेपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांचा नकारात्मक परिणाम अधिक झाल्याने नव्याने भाजपशी जुळलेला मतदार या वेळी आपकडे वळला, असा निष्कर्ष आता संघ वर्तुळात काढला जाऊ लागता आहे.
संघ परिवार व भाजपशी संबंधित धार्मिक नेत्यांची आक्रमक वक्तव्ये वादग्रस्त ठरत आहेत. एकीकडे मोदी विकासाचा चेहरा घेऊन पुढे जात असताना रामजादा-हरामजादा, चार अपत्ये, घरवापसी यांसारख्या मुद्दय़ांवरून अनेक वाद निर्माण झाले. मागील विधानसभा निवडणुकीत तसेच याही वेळी भाजपने ३३ टक्के मते मिळवली आहेत. आक्रमक हिंदुत्ववाद्यांना या निवडणुकांदरम्यान नियंत्रणात राखण्यात मोदी-भागवत जोडीला यश आले होते. नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्येही या आक्रमक गटाला शांत बसवण्यात आल्याने भाजपला समाधानकारक यश मिळाले. याउलट, बिहार व उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपला पराभव पत्करावा लागला व अशीच परिस्थिती दिल्लीतही झाली असल्याचे मत संघ कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्ली निवडणुकांचे अभियान स्वत:भोवती केंद्रित केल्याचाही फटका भाजपला बसला आहे. संघ नेतृत्वाने वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांना नियंत्रणात ठेवले पाहिजे, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. अर्थात, या पराभवामुळे भाजपचे फार काही नुकसान होणार नसल्याचे मानणारा वर्गही संघ परिवारात आहे.
जहाल हिंदुत्ववाद्यांना नियंत्रणात ठेवणे, दिल्ली पराभवाचे चिंतन करून झालेल्या चुका टाळणे, तसेच दिल्ली व विदर्भाचे वेगळे राज्य जाहीर करणे यांसारख्या बाबी भाजपने कराव्या, अशीही प्रतिक्रिया आता संघ परिवारातील कार्यकर्ते व्यक्त करू लागले असल्याचे देवधर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकांच्या अगोदर मोदींचा पोशाख, केजरीवालांवर केलेली वैयक्तिक टीका, त्यांची काही वक्तव्येही नव्याने जुळलेल्या मतदारांना पटली नाहीत, अशीही प्रतिक्रिया संघ वर्तुळात उमटत आहे.
-दिलीप देवधर, संघ-भाजप अभ्यासक

मंदार मोरोणे

निवडणुकांच्या अगोदर मोदींचा पोशाख, केजरीवालांवर केलेली वैयक्तिक टीका, त्यांची काही वक्तव्येही नव्याने जुळलेल्या मतदारांना पटली नाहीत, अशीही प्रतिक्रिया संघ वर्तुळात उमटत आहे.
-दिलीप देवधर, संघ-भाजप अभ्यासक

मंदार मोरोणे