100 Years of Rashtriya Swayamsevak Sangh Live : आगामी विधानसभा निवडणुका व संघाचे शतकोत्तर वर्षात पदर्पण, या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहेत. या उत्सवाची तयारी संघाकडून जोरात सुरू असून बुधवारी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचा सरावही केली. या कार्यक्रमातून सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच संघ शतकोत्तर वर्षात पदार्पण करणार असल्याने सरसंघचालक आपल्या भाषणातून कुठल्या विषयांना स्पर्श करतात याचेही आकर्षण आहे.

Live Updates

RSS Century Dasara Melava 2024 Live Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष…

00:44 (IST) 12 Oct 2024

RSS Founder Keshav Baliram Hedgewar: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे महाल भागात निवासस्थान आहे. याच घरात हेडगेवार यांचा १ एप्रिल १८८९ रोजी जन्म झाला. त्याच घरात संघानेही जन्म घेतला. डॉक्टरांचे निवासस्थान स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असून ऐतिहासिक वारसा म्हणून त्याकडे बघितले जाते. घराची रचना जुन्या वाड्यासारखी आहे. तेथेच १९२५ साली विजयादशमीला संघ स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही वास्तू सध्या संघाच्या मालकीची आहे. निवासस्थानाचा काही भाग मोडकळीस आला असताना त्याची दुरुस्ती करण्यात आली. घरामध्ये प्रवेश केल्यावर डॉक्टरांच्या जीवन कार्याची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे.

देश विदेशातून डॉक्टरांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी स्वयंसेवक येत असल्यामुळे महापालिकेच्या वतीने २५ मे २०११ मध्ये निवासस्थान परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. सध्या घरामध्ये एक स्वयंसेवक राहतो. देश-विदेशातून आलेले स्वयंसेवकांनी या निवासस्थानाची माहिती दिली जाते. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी विजयादशमी कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला आले असताना त्यांनी या निवासस्थानाला भेट दिली होती. डॉ. हेडगेवार हे याच वास्तूत १८८९ ते १९४० पर्यंत राहात होते. मात्र त्यांचा मृत्यू श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांच्या बंगल्यात झाला.

23:45 (IST) 11 Oct 2024
RSS Marks 100 Years : स्मृतिमंदिर! लाखो स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान

जगातील लाखो स्वयंसेवकांसाठी श्रद्धास्थान असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्या सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांचे समाधीस्थळ म्हणजे रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर. नागपुरात येणारा प्रत्येक स्वयंसेवक हा मुख्यालयासोबतच स्मृतिमंदिर परिसरातून प्रेरणा घेऊन परत जातो.

डॉ. केशव हेडगेवार यांचे १९४० च्या जून महिन्यात निधन झाल्यावर रेशीमबागेच्या भूमीवरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांची समाधी म्हणजे एक साधा विटांचा चौथरा होता. या चौथऱ्यास चुन्याचा गिलावा करून त्यावर एक तुळशीवृंदावन ठेवले होते. या चौथऱ्याच्या सभोवती संघस्वयंसेवकांनी एक छोटासा मंडप तयार केला. त्यावर वेली सोडण्यात आल्या. या समाधीचे दर्शन १९४० पासून ते १९५९ पर्यंत अनेकांनी घेतले. त्यानंतर डॉक्टरांची समाधी चिरकाल टिकणारी असावी, असे अनेक स्वयंसेवकांच्या मनात आले. १९५५चा तो काळ. वास्तुशास्त्रज्ञ मा. प. दीक्षित यांच्याकडे हे काम देण्यात आले. गोळवलकर गुरुजींना भेटून ऑक्टोबर १९५६ मध्ये स्मृतिमंदिराचे चित्र तयार करण्यात आले. पुतळा ठरवणे, जागेसंदर्भात मंजुरी या सर्व प्रक्रियेनंतर १९५९ मध्ये स्मृतिमंदिराचे भूमिपूजन गोळवलकर गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. स्मृतिमंदिराच्या उभारणीत अनेकांचा हातभार लागला.

22:45 (IST) 11 Oct 2024

ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक यांनी संघाच्या शतकी प्रवासाचे अनेक पैलू उलगडले. ते म्हणाले, संघाचे नाव ठरायचे होते तेव्हा रामटेकमध्ये होणाऱ्या रामनवमी उत्सवामध्ये सेवा द्यायला स्वयंसेवक जात होते. त्यामुळे ‘राम स्वयंसेवक संघ’ असे नाव ठेवावे अशी चर्चा झाली. परंतु, शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावावर एकमत झाले.

22:44 (IST) 11 Oct 2024

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शाखा हे अविभाज्य समीकरण. निष्ठावंत घडवण्याची कार्यशाळा म्हणूनही शाखेकडे बघितले जाते. संघाची बिजे नागपुरात रोवली गेली. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १७ जणांना घेऊन सुरू केलेल्या शाखेपासून ते आज शहरात असलेल्या ३३० शाखांपर्यंतचा प्रवास तसा संघर्षाचा राहिला आहे. संघाच्या स्थापनेपासून ते शतकोत्तर वर्षाच्या विस्तारात नागपूरचे विशेष महत्त्व. ‘शाखा’ हा संघाचा आत्मा तर येथे येणारा प्रत्येक स्वयंसेवक हा त्याचा श्वास.

मोहन भागवात नेमकं काय बोलणार? (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारवर विरोधकांचा दबाव वाढत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक विजयादशमी उत्सवामध्ये काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर १२ ऑक्टोबरला या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी होणार आहेत. सकाळी ७.४० प्रमुख कार्यक्रम, त्यापूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे.