चिनी लष्कराच्या घुसखोरीबाबत मनमोहन सिंग सरकारने घेतलेली बोटचेपी भूमिका आणि सरकारबाबत जनतेमध्ये असलेला असंतोष यावर भर देऊन भाजपच्या शनिवारपासून गोव्यात सुरू होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या तोंडावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाजपला संभाव्य राजकीय ठरावांबाबत संकेत दिल्याचे मानले जात आहे. अलीकडेच चीनने अरुणाचल प्रदेशात घुसखोरी केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तो ‘स्थानिक प्रश्न’ असल्याचे सांगून त्याचे महत्त्व कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या संतापाला मोहन भागवत यांनी वाट करून दिली. या संकटाचा सामना कसा करावा याचा निर्णय सरकार करू शकले नाही व त्यामुळे आमची कमजोरी शत्रूसमोर उघड झाली याची जाणीव त्यांनी करून दिली. चीनचे सैनिक परत जावेत म्हणून भारतीय सैन्याने आपल्या ताब्यातील एक ठाणे सोडून दिले अशी चर्चा होती. याबाबतही सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट केली नाही आणि अखेर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना ही गोष्ट खरी आहे का, म्हणून विचारणा करावी लागली याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.
चीनच्या आक्रमणाच्या वेळीही काही लोकांनी आपल्या देशाची सीमाच निश्चित नसल्याचे सांगून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला.
अशा रीतीने शत्रू राष्ट्राचे ‘लॉबिइंग’ होत असल्याबद्दलचा राग सरसंघचालकांनी उघडपणे व्यक्त केला आहे. असे लोकच देशाचे खरे शत्रू असल्याचा टोला त्यांनी लगावला. चीनने आमच्या देशात शिरकाव करावा असे जर देशातील जनतेला वाटत नाही, तर सरकार दुर्बलता का दाखवते, असा प्रश्न विचारून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
चिनी आक्रमणाबद्दल लोकांच्या मनात असलेला संताप, नक्षलवादाचा सामना करण्यात सरकारचे अपयश आणि भ्रष्टाचाराबाबत लोकांच्या मनात असलेली चीड हे ‘अपील’ होणारे मुद्दे घेऊन सरसंघचालकांनी सरकारवर प्रहार केले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून गोव्यात सुरू होत आहे. या बैठकीत देशाची अंतर्गत व बाह्य़ सुरक्षेची परिस्थती आणि देशासमोरील आव्हानांचा परिणामकारकरीत्या सामना करण्यात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला आलेले अपयश या दोन विषयांवर ठराव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरसंघचालकांनी भाजपला केलेले दिशादिग्दर्शन असा मोहन भागवत यांच्या भाषणाचा अर्थ लावला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा