OTT प्लॅटफॉर्म्स हा आजच्या काळातला मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या वेबसीरिज, चित्रपट, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स असा अगणित मजकूर या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून प्रदर्शित केला जातो. प्रौढांसाठीच्या मजकुराला तसं प्रमाणपत्र व सूचना देऊन प्रदर्शित केलं जातं. पण सर्वच प्रकारचा मजकूर या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. याचसंदर्भात आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्ताने नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयात केलेल्या भाषणातून तीव्र आक्षेप नोंदवला.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने नागपूरमधील मुख्यालयात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार सकाळी संघ स्वयंसेवकांचं पथसंचलन व मान्यवरांची भाषणं झाली. शेवटी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषणातून त्यांची भूमिका मांडली. दरवर्षी दसरा मेळाव्याला सरसंघचालक आपल्या भाषणात कोणते विचार मांडणार? याची चर्चा संघ स्वयंसेवकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातही असते. आज त्यांनी केलेल्या भाषणात भारतातील सद्य परिस्थितीबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील मजकुरावरही केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे.

काय म्हणाले सरसंघचालक?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी कुटुंबातून व्यक्तीला मिळणारे संस्कार, शिक्षण आणि समाजातील घडामोडींचा व्यक्तीच्या मनावर होणारा परिणाम यावर भाष्य केलं. “शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण म्हणजे प्रबोधन होतं. वाचन होतं. ऐकणं होतं. पण तिथे जे शिकवलं जातं, त्याचं मूर्तीमंत उदाहरण शिक्षक-प्राध्यापक असायला हवेत. तिथून सुरुवात करायला लागेल. त्यांच्या प्रशिक्षणाचा मार्ग शोधावा लागेल”, असं ते म्हणाले. “पण शिक्षण महत्त्वाचं असलं, तरी वयाच्या ३ ते १२ व्या वर्षापर्यंत घरात होणाऱ्या संस्कारांमधून व्यक्तीची मनोभूमिका रुप घेते. त्या आधारावरच माणसाची आयुष्यभर वाटचाल होत असते”, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.

घर व शिक्षण संस्थांबरोबरच सामाजिक वातावरणही महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. “समाजात ज्यांना पाहून लोक आदर्श घेत असतात, समाजाचे प्रमुख लोक जसं वागतात, तसे इतर सामान्य लोक वागत असतात. विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांची ती क्षमता नाही, त्यांना ते कळतही नाही. जे लोकप्रिय आहेत, प्रभावी आहेत ते व्यक्ती जसं सांगतात, करतात, तसंच लोकही सांगतात आणि करतात. त्यामुळे प्रभावी लोकांना याची काळजी असायला हवी”, अशी भूमिका सरसंघचालकांनी यावेळी मांडली.

Video: सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “तुमच्या लक्षात यायला हवं की…”

माध्यमांनी जबाबदारीनं वागण्याचं केलं आवाहन

दरम्यान, माध्यमांनी जबाबदारीनं वर्तन ठेवण्याचा सल्ला यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांनी दिला. “समाजाची मानसिकता तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माध्यमांना याची चिंता करायला हवी की आपल्या कृतीतून समाजाची धारणा, भद्रता, मांगल्य कायम राखणाऱ्या मूल्यांचं पोषण व्हायला हवं. किमान या गोष्टींना धक्का लागेल असं तरी काम करायला नको”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील मजकुरावर भाष्य केलं.

“ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वगैरैंवर ज्या गोष्टी दाखवल्या जातात, ते सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स असतं. त्यामुळेच मी म्हणतो की या सगळ्यावर कायद्यानेही नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे. संस्कार भ्रष्ट होण्यामागचं एक मोठं कारण तेही आहे”, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी आपला आक्षेप व्यक्त केला.