समाजात बोले तसा चाले याची उणीव आहे. जसे बोललो तसे वागण्यासाठी सामथ्र्य कमवावे लागते. सवयी बदलाव्या लागतात, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना सांगितलेली ज्युलियस सीझरची गोष्ट भुवया उंचवायला लावणारी ठरली. तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले या पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केल्याने नव्या सरकारला संघाच्या या कानपिचक्या तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी महासंगम या संमेलनात भागवत यांनी सुमारे ४२ हजार स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
देवगिरी संमेलनातील एक तासाच्या भाषणात सरसंघचालक भागवत यांनी सुरुवात केली ती ज्युलियस सीझरच्या गोष्टीने. सगळा देश व्यापून टाकणे हे संघाचे काम नाही असे सांगत त्यांनी बौद्धिकास सुरुवात केली. राजा येतो, पाहतो, जिंकतो पण त्याच्या पुढे काय, त्याचं काम काय?, त्याच्या जिंकण्याच्या पराक्रमाचे कौतुक होईल. पण समाज मनावर प्रभाव राहिला तो प्रभू रामचंद्रांचा. तसे करायचे झाल्यास जन्मभर चिकटलेल्या सवयी बदलाव्या लागतील असे ते म्हणाले. या त्यांच्या गोष्टीत राजकीय अर्थ काढला जात आहे. त्यांच्या भाषणात सामाजिक समरसतेवरही भर होता. ते म्हणाले धर्म म्हणजे पूजा नाही. पूजा अनेक आहेत. सत्य एक आहे. ते सत्य िहदू संस्कृतीत दडले आहे. ती आचरणातून अंगी बाणावी लागते. समाज व्यवहारात बदल करावयाचे झाल्यास भेद परंपरेची विकृती काढावी लागेल. त्या साठी कोणाच्या विरोधात काम करण्याची आवश्यकता नाही. पूजा बदलून उपयोग नसतो. तसा आपल्या संस्कृतीला पोषक समाज घडवावा लागतो, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून ६ दशके उलटून गेली आहेत. तरीही आपला देश मागे का, आजही आपल्याला स्वच्छतेचे धडे द्यावे लागतात. भारताने इस्राएलचा आदर्श बाळगायला हवा.
– मोहन भागवत, सरसंघचालक

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat guidance to rss members