जी जात नाही, ती जात.. हे विधान आजपर्यंत अनेकदा अनेक चर्चासत्रांमधून, भाषणांमधून आणि पुस्तकांमधून आपल्या वाचनात, ऐकण्यात आणि चर्चेत आलं आहे. मात्र, आता ही जातव्यवस्था घालवायला हवी, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टींचं समूळ उच्चाटन आता करायला हवं, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाची आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा. वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी मोहन भागवत बोलत होते.
या पुस्तकासंदर्भात बोलताना मोहन भागवत म्हणाले, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.
“वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असेही मोहन भागवत म्हणाले.
“सामाजिक एकता भारतीय संस्कृतीचा भाग होती”
दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी कधीकाळी भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेली सामाजिक एकता काळाच्या ओघात मागे पडल्याची खंत व्यक्त केली. “सामाजिक एकता हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. पण नंतर त्याचा विसर पडला आणि त्यामुळे समाजाला गंभीर परिणाम भोगावे लागले”, असं ते म्हणाले. “जर आज कुणी जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्थेविषयी विचारणा केली, तर ‘तो आता भूतकाळ आहे, तो आपण विसरायला हवा’, असंच उत्तर येईल”, असंही मोहन भागवत यांनी नमूद केलं.
सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ब्राह्मणांनी पापक्षालन करायलाच हवे!
“ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.