लोकसभा निवडणुकीचे टप्पे १ जूनला संपले. त्यानंतर निकालही लागला. एनडीएची सत्ता आली आहे आणि मोदींनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची देशातल्या निवडणुकीवर, राजकारणावर आणि मणिपूरवरची प्रतिक्रिया समोर आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वीतीय या समारंभाला ते संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी मणिपूरबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मोहन भागवत?

“सर्वसहमतीने देश चालला पाहिजे यासाठी संसद आहे. निवडणूक ही एक प्रकारची स्पर्धा आहे, स्पर्धेमुळे अडचणी येतात त्यामुळे बहुमत महत्त्वाचं असतं. या निवडणुकीत संघासारख्या संघटनेला ओढण्यात आलं. बरंच काही बोललं गेलं. टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन गोष्टी मांडल्या गेल्या. विद्येचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करायचा असतो. मात्र या आधुनिक तंत्राचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. निवडणूक लढताना एक प्रकारची मर्यादा असते”

लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे

“लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवं”, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

अभिनेते नाना पाटेकर पुत्र मल्हारची संघाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, काय होते औचित्य

वर्षभरापासून मणिपूर जळतंय…

मणिपूरबाबत मोहन भागवत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. “मागच्या वर्षभरापासून अधिक काळ मणिपूर जळतंय, मणिपूरचा विचार करुन तिथे शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. हे कुणी घडवून आणलं आहे? याकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून बरीच कामं करायची आहेत. सगळी कामं सरकार करणार नाही. मणिपूर अनेक वर्ष शांत होतं. आता पुन्हा पेटलं आहे. जुने वाद बंद जाले पाहिजेत. द्वेषाचं वातावरण निर्माण झाल्याने मणिपूरमध्ये त्राहीमाम परिस्थिती आहे. त्यामुळे मणिपूर शांत करण्यासाठी प्राधान्य देणं आवश्यक आहे.” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

पुढच्या पिढीला संस्कृती शिकवणं आवश्यक

मोहन भागवत त्यांच्या भाषणात म्हणाले, “चांगल्या कुटुंबातील महिला दारू पिऊन गाडी चालवते आणि लोकांना चिरडते. मग कुठे गेली आपली संस्कृती? संस्कृती आपण टिकवली तरच समाज टिकेल. त्यामुळे पुढच्या पिढीला आपण आपल्या संस्कृतीचे योग्य ज्ञान देणे गरजेचं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat said manipur is waiting for peace need to get over election now scj