देशात सर्वानी चांगले हिंदू होणे गरजेचे आहे. हिंदू हे स्वत्व आहे. हिंदूंचा विकास अनुकरणातून होणार नाही. देशाला प्रथमस्थानी ठेवणारा माणूस तयार झाला पाहिजे. स्वत्वचा गौरव करणारे कार्यकर्ते हवेत, ज्यामुळे एक संघटित समाज तयार होईल आणि त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोपा कार्यक्रम दिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने येथील आर. पी. विद्यालयाच्या मैदानावर भागवत यांच्या प्रकट भाषणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी वेगवेगळे दाखले देऊन संघाची कार्यपद्धती व महत्त्व विशद करताना संघाला कोणी शत्रू नसल्याचे मत मांडले.
चीन हा आपला मित्र म्हणत असला तरी त्या देशावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. पाकिस्तान तर भारतात अस्थिरता निर्माण करणारा प्रमुख घटक आहे. भारत मोठा होत असला तरी त्याच्या गरजाही वाढत आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यात शासन कमी पडते. याबद्दल शासनाला दोष देऊन उपयोग नाही. कारण, शासनाला आपणच निवडून देतो. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दिवसातील सात तास समाज अर्थात देशासाठी दिले पाहिजे. संघाला संपूर्ण हिंदू समाज एकत्र करायचा आहे. संघाच्या शाखेतून चांगली कामे कशी होतात हे अनुभवायचे आता दिवस आले आहेत. विरोधासाठी आम्हाला विरोध होतो, पण आम्ही तसा विरोध करणाऱ्यांना क्षमा करू. हिंदू समाज संघटित होऊन एक कुटुंब म्हणून उभा राहणार असल्याचा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला.
अनुभवसिद्ध व प्रयोगसिद्ध कार्यपद्धती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. संघाची स्थापना कोणाच्या विरोधातून झालेली नाही. कोणत्या घटनेच्या प्रतिक्रियेतून झालेली नाही. समाजाची संघटित अवस्था हे कोणत्याही स्वच्छ समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करण्यापूर्वी आठ ते दहा वर्ष आणि स्थापना झाल्यानंतरही काही वर्ष सातत्याने या संदर्भातील प्रयोग केले. आपण समता व इतर अनेक विषयांवर चर्चा करतो. परंतु, कोणत्याही प्रश्नावर वा समस्येवर चर्चा करताना ती आपली समस्या आहे, तो आपला प्रश्न आहे, असे वाटले पाहिजे. याकरिता त्यांनी आसाममधील समस्यांचे उदाहरण दिले. त्या समस्या आपल्याला माहीत आहेत.
परंतु, जेव्हा हा संपूर्ण भारत देश माझा आहे, त्यातील सर्व बांधव, भूमी, जैवविविधता व पर्यावरणातील सर्व घटक हे सर्व आपले आहेत, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे असल्याचे भागवत यांनी नमूद केले. जेव्हा आपल्या देशातील प्रत्येक समस्येकडे आपण या दृष्टिकोनातून पाहू, तेव्हा त्यांचे निराकरण करणे फारसे अवघड जाणार नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा