Bhaiyyaji Joshi on Aurangzeb Tomb: गेल्या महिन्याभरापासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वाद अद्याप शमल्याचं दिसत नसून राजकीय वर्तुळात यावर दावे-प्रतिदावे चालू आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. तसेच, सरकारनं ती हटवली नाही, तर संघटनेकडून ती हटवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यासदर्भात मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच भूमिका मांडली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही यासंदर्भात आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात भूमिका मांडली होती. “संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही”, असं म्हटलं होतं. औरंगजेबाची कबर हा मुद्दा थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील आला. यावरून राजकीय पक्ष आक्रमक झाले असताना संघाकडून पुन्हा एकदा याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.
काय म्हणाले भैय्याजी जोशी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांना माध्यम प्रतिनिधींनी औरंगजेब प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली. तेव्हा हा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात असल्याचं ते म्हणाले. तसेच, ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असंही त्यांनी नमूद केलं.
“औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यकपणे चर्चिला जात आहे. औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे भारताच्या उदारतेचं, सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे”, असं भैय्याजी जोशी म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरेंची भूमिका
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील औरंगजेबाच्या कबरीबाबत काहीशी संघाच्या भूमिकेप्रमाणेच भूमिका मांडली. “औरंगजेबाच्या कबरीवरची सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि तिथे एक बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असं त्यावर लिहा. हा आमचा इतिहास आहे”, असं राज ठाकरे म्हणाले. औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण हे औरंगजेबाला जमलं नाही, शेवटी तो इथेच मेला, असंही राज ठाकरे पाडव्यानिमित्त मनसेच्या जाहीर सभेत म्हणाले.