वाढती महागाई, देशाच्या संरक्षणाबाबत बोटचेपे धोरण, राजकीय स्वार्थासाठी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण यांसारख्या अनेक गोष्टींना सामान्य नागरिक कंटाळले असून त्यांना परिवर्तन हवे आहे. यासाठी ‘तात्कालिक कर्तव्य’ म्हणून येत्या निवडणुकीत राष्ट्रहिताचे धोरण असलेल्या पक्षाला निवडा आणि ‘शत प्रतिशत मतदान करा’, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी महोत्सव रविवारी रेशीमबाग मैदानावर साजरा करण्यात आला. या वेळी केलेल्या भाषणात भागवत यांनी देशाशी संबंधित अनेक मुद्दय़ांवर चिंता व्यक्त केली. सामान्य नागरिकांसाठी निवडणूक हे राजकारण नाही, तर लोकशाहीने दिलेला आपला अनिवार्य हक्क बजावण्याची संधी आहे. अनेक नवीन आणि युवक मतदार राहणार आहेत. आपले नाव मतदार योग्य प्रकारे समाविष्ट झाले आहे की नाही हे तपासून पाहण्याची सूचना मोहन भागवत यांनी केली.
केवळ सत्तास्वार्थासाठी आंधळे होऊन आणि राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी सरकार देशहिताविरुद्ध कारवाया करत असल्याचा आरोप करून सरसंघचालकांनी या संदर्भात मुजफ्फरनगरच्या दंगलींचे उदाहरण दिले. यातूनच कायदेशीर कर्तव्य बजावणाऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले, तसेच शांततेच्या मार्गाने निघणार असलेली अयोध्या परिक्रमा थांबवून व तिला वादग्रस्त बनवून खोटय़ा धर्मनिरपेक्षतेच्या आड सांप्रदायिक भावना भडकावण्याचा खेळ खेळण्यात आला. कथित अल्पसंख्याक युवकांबाबत मवाळ भूमिका घेण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची सूचनादेखील तुष्टीकरणासाठी असल्याची टीका त्यांनी केली. जम्मूतील किश्तवाड येथे तर हिंदू व्यापाऱ्यांची दुकाने लुटण्याचे काम सांप्रदायिक विद्वेषाने प्रेरित झालेल्या गर्दीने राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत केले, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. चीन व पाकिस्तानच्या आगळिकीकडेही त्यांनी लक्ष वेधले. चिनी वस्तूंचा बहिष्कार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा