दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्ये छापून आलेल्या एका लेखाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ‘मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’ या मथळ्याखाली छापून आलेल्या या लेखात अजित पवारांमुळे भारतीय जनता पक्षाचं नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून सध्या राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली असून हा लेख लिहिणारे आरएसएसचे आजीवन सदस्य रतन शारदा यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. अवघी दोन टक्के मतं जरी इकडची तिकडं झाली असती, तरी निकाल वेगळा लागला असता, असं ते म्हणाले आहेत.
हा लेख प्रकाशित झाल्यानंतर त्यावरून महायुतीमध्ये खुलासे आणि उत्तरांना सुरुवात झाली. अजित पवार गटाकडून ‘पराभवाचे खापर आमच्यावर नको’, अशी भूमिका घेण्यात आली आहे. ‘लेखाशी राष्ट्रवादी पक्ष सहमत नसून भाजपचे नेतृत्वसुद्धा या लेखातील भूमिकेशी सहमत असणार नाही’, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.
काय आहे ‘ऑर्गनायझर’मधील लेखात?
‘महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली’, असं या लेखात म्हटलं आहे.
रतन शारदा यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, या लेखावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर रतन शारदा यांनी टीव्ही ९ शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. “शरद पवार त्यांची मुलगी आणि पुतण्याच्या वादात त्रस्त होते. अजित पवार बाहेर पडल्यामुळे त्यांची अडचण दूर झाली”, असं रतन शारदा म्हणाले.
“अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली”, संघाच्या मुखपत्रातून टीका
“तुम्ही व्यापक चित्र पाहिलं, तर ७० वर्षं या पक्षांनी नेहमी एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या. विशेषत: महाराष्ट्रात, जिथे समाजवादी विचार आणि काँग्रेस सातत्याने हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधात लढत राहिले. कोणत्याही ठिकाणी हिंदुत्ववादाला पुढे जाता येत नव्हतं हा इतिहास आहे. या परिस्थितीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष झाल्यानंतर त्यांचे मतदार राष्ट्रवादी काँग्रेसला मत देतील का? राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुरुवातीपासूनच ते या सगळ्या गोष्टी समजू शकले नाहीत. भाजपा, जनसंघाच्या विरुद्ध असणारी मतं त्यांच्याकडे वळतील का? स्पष्टच आहे की ही मतं वळली नाहीत”, अशा शब्दांत रतन शारदा यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केलं.
वरच्या स्तरावरची युती शेवटच्या मतदारांना नापसंत!
दरम्यान, ही युती शेवटच्या मतदारांना पसंतीस पडली नसल्याचं रतन शारदा म्हणाले. “तुम्ही एकमेकांसोबत युती केली, तरी शेवटच्या स्तरावरील मतदारांना ते पसंत पडलेलं नाही. तुम्ही मतांची आकडेवारी पाहा. मी वेगळं सांगण्याची गरज नाही. एवढा संभ्रम आहे की मुस्लिमांच्या मतांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकते. ज्यांच्या वडिलांनी सातत्याने प्रखर हिंदुत्ववादाचा विचार ठेवला. १९९३ च्या घटना लोक विसरले नाहीयेत. ते जर मुस्लीम मतांनी जिंकले तर याचा अर्थ तिथे एकाच ठिकाणी मतांचं केंद्रीकरण झालं. बाकी सगळी मतं तर विभागली गेली”, असं विश्लेषण रतन शारदा यांनी केलं.
“एकीकडे घड्याळ, एकीकडे हात, एकीकडे धनुष्यबाण, एकीकडे भाजपा…ही विचित्र परिस्थिती होती. दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना होत्या. काँग्रेसचे लोक भाजपात, काही लोक काँग्रेसमधून बाहेर, काही लोक भाजपातून बाहेर. जेव्हा मतदार मत देण्यासाठी पोहोचला, तेव्हा त्याला कळत नव्हतं की माझं घड्याळ चिन्ह कुठे आहे, माझं मशाल चिन्ह कुठे आहे”, असंही रतन शारदा म्हणाले.
“पक्षांनी संभ्रम निर्माण केला, परिणाम भोगावा लागला”
“एकीकडे कार्यकर्त्यांची बांधीलकी एका नेत्याशी आहे, एका पक्षाशी आहे. पण अचानक त्यांच्यासमोर दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आला. सगळ्या पक्षांनी मतदारांच्या मनात निर्माण केलेला हा संभ्रम आहे. त्याचा परिणाम भोगावा लागला. कदाचित दोन टक्के मतं जास्त मिळाली असती, तर फासे उलटे पडले असते. कदाचित निकालही वेगळा लागला असता. एकगठ्ठा मतं फक्त मुस्लिमांची शिवसेनेला पडली. बाकी सगळे संभ्रमात होते. त्यामुळे नुकसान झालं”, असं शारदा यावेळी म्हणाले.
पराभवाचे खापर आमच्यावर नको; ‘ऑर्गनायझर’मधील लेखावर राष्ट्रवादीची भूमिका
“सध्याचं संभ्रमाचं वातावरण निवळण्यासाठी राजकीय पक्षांना पुढाकार घ्यावा लागेल. एक समान कार्यक्रम राबवणे, महाराष्ट्राच्या विकासावर बोलणे, आपलं स्पष्ट धोरण जनतेसमोर ठेवणे या गोष्टी कराव्या लागतील. इथे नेते इथून तिथे, तिथून इथे झाले. पण कुणीही आपली ब्लू प्रिंट दिलेली नाही. जोपर्यंत ती समोर येणार नाही, तोपर्यंत संभ्रम दूर कसा होईल? ही अडचण आहे”, अशा शब्दांत त्यांनी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवरही भाष्य केलं.