रामजन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर होते हे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर राममंदिर उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, काहीजण स्वार्थासाठी राजकारण करून आणि न्यायालयात याचिका दाखल करून राममंदिरात अडथळे आणत आहेत. त्यामुळे सरकारने कायदा करून राममंदिर बांधावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येथील रेशीमबाग मैदानावर शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव साजरा केला. या वेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना भागवत बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी उपस्थित होते.
राममंदिर हा हिंदूंच्या गौरवाचा विषय आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर व्हावे, अशी कोटय़वधी भारतीयांची इच्छा आहे. संघाचीही अशीच इच्छा आहे, असेही भागवत म्हणाले. ‘‘रामजन्मभूमीच्या जागेवर राममंदिर होते, हे सर्व प्रकारच्या पुराव्यांनी दाखवून दिले आहे. परंतु अजूनही ती जागा ताब्यात मिळालेली नाही. काहीजण न्यायालयात नवनवे दावे दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे आणत आहेत. कोणीही समाजाच्या संयमाची नाहक परीक्षा घेऊ नये, असा इशाराही भागवत यांनी दिला. राममंदिर उभारल्यानंतर समाजात सद्भावना आणि एकता निर्माण होईल,’’ असेही ते म्हणाले.
राममंदिर हा देशहिताचा प्रश्न आहे. परंतु काही मूलतत्त्ववादी लोक त्यात अडथळे निर्माण करून स्वार्थासाठी जातीय राजकारण करत आहेत. राजकारणामुळेच राममंदिर उभारण्यास विलंब होत आहे, असेही भागवत यांनी नमूद केले.
अनुसूचित जाती आणि जमातींपर्यंत शासकीय योजना पोहोचायला हव्यात, त्या पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असे नमूद करून भागवत म्हणाले, की या प्रवर्गातील लोकांवर काही ठिकाणी अन्याय, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. परंतु चार वर्षांपासून अशा घटना वेगळ्या पद्धतीने समाजासमोर मांडल्या जात आहेत. वारंवार आंदोलने आणि मोर्चे काढून सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्यात येत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलने झाली पाहिजेत आणि मोर्चेही निघायला हवेत. मात्र, माओवादी संघटनांशी संबंधित लोक अशा आंदोलनांमध्ये दिसत असतील तर सरकारला खबरदारी घ्यावी लागेल. नक्षलवाद्यांमध्ये शहरी नक्षलवादीच अग्रेसर असतात. ते विद्यापीठांमधून मनुष्यबळ तयार करतात आणि त्यांचा वापर जंगलात बंदुकीच्या ताकदीवर सत्ता उलथवून टाकण्यासाठी करतात. समाजमाध्यमांवर लोकांना चिथावणारे संदेश पसरवणे आणि देशविदेशात भारताविरुद्ध वातावरण निर्माण करणे, अशी त्यांची योजना असते. त्यामुळे सरकारने शहरी नक्षलवादावर प्रभावी कारवाई करणे आवश्यक आहे, असेही भागवत म्हणाले.
पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता सरसंघचालकांनी, राष्ट्रहित आणि देशाच्या एकतेसाठी लढणारा पक्ष किंवा उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. निवडणुकीत मतदान न करणे किंवा ‘नोटा’चा वापर करणे म्हणजे सर्वात वाईट उमेदवाराला मदत करणे. त्यामुळे राष्ट्राचे तुकडे होऊ न देणाऱ्या किंवा राष्ट्रहित जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करून १०० टक्के मतदानासाठी स्वयंसवेकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन भागवत यांनी केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, के. अल्फॉन्स, प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान, त्यांच्या पत्नी सोहा खान या वेळी उपस्थित होते.
न्यायालयामुळे शबरीमला वाद!
केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशामुळे सुरू असलेल्या वादावर बोलताना सरसंघचालक म्हणाले की, न्यायालयाने कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अधिक लक्ष घालायला हवे. धार्मिक बाबींवर निर्णय घेताना त्या धर्माच्या प्रतिनिधींशी आणि श्रद्धाळूंशी चर्चा करूनच निर्णय घ्यायला हवा. शबरीमला मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून कोणीही भक्त न्यायालयात गेले नव्हते किंवा महिला प्रवेशासाठी तेथे आंदोलनही झाले नव्हते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचे महिलाही पालन करीत असताना न्यायालयाच्या आदेशामुळे अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे.
विश्वासाशिवाय राष्ट्रनिर्माण अशक्य : सत्यार्थी
कुणाला पाठिंबा देणे किंवा कुणावर टीका करण्यापेक्षा तरुणाईने आपले सांस्कृतिक मूल्य ओळखून संवेदनशील, सर्वसमावेशक, सुरक्षित, स्वावलंबी आणि स्वाभिमानी भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाला शिक्षण, संस्कार, संरक्षण, आरोग्य सुविधा आणि स्वातंत्र्य मिळायला हवे. विश्वास, सुरक्षित वातावरण आणि व्यवस्थेच्या सहकार्याशिवाय राष्ट्रनिर्मिती होऊ शकत नाही, असे मत कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केले.
‘नवे शैक्षणिक धोरण हवे’
सरकारला साडेचार वर्षे झाली, परंतु अजूनही नवे शैक्षणिक धोरण अमलात आले नाही. वेळ निघून जात असताना सरकार कशाची प्रतीक्षा करीत आहे, हे कळत नाही, असा टोला सरसंघचालकांनी लगावला. संरक्षण क्षेत्रात परिपूर्ण असल्याशिवाय महाशक्ती होता येणार नाही. त्यामुळे देशाच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. त्याकरिता लष्करी ताकद आणखीमजबूत व्हायला हवी. आवश्यक शस्त्रे खरेदी करण्याबरोबरच ती देशात विकसित करण्यावर भर द्यावा. त्यासाठी सरकारने उचललेले पाऊल योग्य आहे. मात्र, त्याची गती वाढवण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करताना भागवत यांनी राफेल खरेदीच्या वादाबाबत संघाची भूमिका मांडणे टाळले.
भागवत उवाच..
* राजकारणामुळेच राममंदिर उभारण्यास विलंब
* शबरीमलात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचे महिलाही पालन करीत असताना न्यायालयाच्या आदेशामुळे अस्थिरता आणि अशांतता निर्माण झाली आहे
* नक्षलवाद्यांमध्ये शहरी नक्षलवादीच अग्रेसर असतात. ते विद्यापीठांमधून मनुष्यबळ तयार करतात आणि त्यांचा वापर जंगलात बंदुकीच्या ताकदीवर सत्ता उलथवून टाकण्यासाठी करतात
* आवश्यक शस्त्रे खरेदी करण्याबरोबरच ती देशात विकसित करण्यावर भर द्यावा
* १०० टक्के मतदानासाठी स्वयंसवेकांनी प्रयत्न करावेत