भारत शांतता व अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश आहे. हिंसेने फक्त नुकसानच होते. गेल्या काही वर्षांत भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. त्यामुळे भारत निश्चितच विश्वगुरु होईल, असा विश्वास व्यक्त करत भारत इतका बलवान बनावा की आक्रमण करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.
Nagpur: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Chief Mohan Bhagwat and Union Minister Nitin Gadkari at RSS Vijayadashami Utsav. #Maharashtra pic.twitter.com/uPhj0eNJnD
— ANI (@ANI) October 18, 2018
मोहन भागवत काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भागवत यांनी सुमारे दीड तासांच्या आपल्या भाषणात राम मंदिर, शबरीमला मंदिर प्रवेश, शहरी नक्षलवाद, मतदान, देशाची सुरक्षिततेसह विविध विषयावंर भाष्य केले. तत्पूर्वी, मोहन भागवत यांनी शस्त्र पूजन केले. यावेळी नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यर्थी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुरुवातीला संघ स्वयंसेवकांचे पथ संचलन झाले.
देशाचे जवान सीमेवर एकटे लढतात. अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. जवान आपल्या सुरक्षेसाठी बलिदान देतात, हे समाजाचे दायित्व आहे. देश आपला आहे, पण आपण देशाला सरकारकडे सोपवलंय का, असा सवाल करत सरकारसोबत समाजाची जबाबदारीही महत्वाची असते. सरकारसोबत जनतेनेही विकासात पुढाकार घ्यायला हवा. सगळे काही सरकारवर सोडून चालणार नाही. देशाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ते आपल्या हातात असते, असे सांगत सरकारने कामाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच सध्या देशात पोलीस दलाची अवस्थाही चांगली नाही. त्यांचे कामाचे स्वरुपही विचित्र असते. याची योग्य रचना करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
सुरक्षित तोच असतो जो शस्त्रास्त्रात प्रबळ असतो. आपल्या सुरक्षेसाठी आपण दुसऱ्यावर निर्भर राहू नये. सुरक्षेत आपण अधिक स्वावलंबी व्हायला हवे. स्वावलंबन नाही तर सुरक्षितता नाही. शेजारच्या देशाचे सरकार बदलले पण त्यांची नियत मात्र बदलली नाही, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता टीका केली.