ऑटो रिक्षा परवान्याच्या वाटपासाठी सोडत पद्धतीने यशस्वी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या अर्जदारांना कागदपत्रांची छाननी करून इरादापत्रे दिली जाणार आहेत. इरादापत्र मिळाल्यावर अर्जदारास सहा महिन्यांपर्यंत रिक्षा नोंदणी करता येणार आहे. तसेच वितरकांकडे पुरेशा प्रमाणात रिक्षांचा साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे दलाल वा अनधिकृत व्यक्तींच्या अपप्रचाराला बळी न पडता अतिरिक्त रक्कम देऊन कोणी नोंदणी करू नये आणि ज्यांची सोडतीत निवड झालेली नाही, त्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
राज्यातील ८१ हजार रिक्षा परवाने वाटपासाठी सोडत पद्धतीने यशस्वी उमेदवारांची निवड ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शुल्क भरलेले एक लाख ५२ हजार ८६५ पात्र अर्जदारांमधून कार्यालयनिहाय सोडतीचे आयोजन करण्यात आले. त्यात ६० हजार ७०० यशस्वी अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेश पाठविण्यात आले आहेत. लॉटरीत यशस्वी झालेल्या अर्जदारांचे अर्ज व कागदपत्रांच्या छाननीचे काम सर्व परिवहन कार्यालयात सुरू आहे. यशस्वी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांना त्वरित इरादापत्र दिली जात आहे. या दरम्यान काही अनधिकृत व्यक्ती व संस्थांमार्फत १५ मार्चपर्यंत ऑटोरिक्षा नोंदणी करणे आवश्यक असल्याचा गैरप्रचार केला जात आहे. तसेच रिक्षांचा तुटवडा असल्याचे कारण देऊन नोंदणीसाठी रिक्षाच्या किमतीव्यतिरिक्त अतिरिक्त रकमेची मागणी केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर, परिवहन विभागाने अपप्रचार व प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना कागदपत्रांच्या छाननीनंतर रिक्षा परवान्यासाठी इरादापत्र दिली जाणार आहे. त्यामुळे ज्यांची या प्रक्रियेत निवड झालेली नाही, त्यांनीही या अपप्रचाराला बळी पडू नये. छाननीत अर्जदार अपात्र आढळल्यास त्याला इरादापत्र दिले जाणार नाही. खोटी, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या अर्जदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या क्रमांकानुसार परिवहन कार्यालयाकडून लेखी पत्राद्वारे कागदपत्र सादर करण्याविषयी कळविले जाणार आहे.
इरादापत्र दिल्या जाणाऱ्या अर्जदारांना रिक्षा नोंदणी करण्याची मुदत ही इरादापत्र मिळाल्यापासून सहा महिने आहे. त्यामुळे दलाल व अनधिकृत व्यक्तींच्या गैरप्रचाराला बळी न पडात त्यांनी इरादापत्र मिळाल्यावर थेट वाहन वितरकाकडे रिक्षा खरेदीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. उत्पादकाने जाहीर केलेल्या किमतीव्यतिरिक्त अतिरिक्त किंमत देऊ नये. उत्पादकांकडे पुरेशा प्रमाणात रिक्षांचा साठा उपलब्ध असून उत्पादनही सुरू आहे, असे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे.

Story img Loader