परभणी :  अ‍ॅटोरिक्षाच्या चालकासाठी फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्याकरता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाने पाचशे रूपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. खाजगी एजंटद्वारे या निरीक्षकाने ही लाच स्विकारली. संबंधित लाचखोरांवर अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.२१) कारवाई केली. या प्रकरणी शनिवारी सकाळी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटार वाहन निरीक्षक संतोष नंदकुमार डुकरे, खाजगी एजंट मुंजा नामदेवराव मोहिते अशी लाचखोरांची नावे आहेत. अ‍ॅटो रिक्षा चालक असलेल्या तक्रारदाराने या संदर्भात तक्रार दिली. फिटनेस प्रमाणपत्रासाठी कार्यालयात अर्ज केल्यावर या तक्रारदाराला पाचशे रूपयांची लाच मागण्यात आली. या प्रकारानंतर संबंधित अर्जदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. शुक्रवारी पोलीस निरीक्षक छाया देवरे व त्यांच्या पथकाने सापळा लावला.                            

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असोला येथील आवारात लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान मुंजा मोहिते याने फिटनेस प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी लाचेची मागणी केली. हा प्रकार निरीक्षक डुकरे यांना माहीत होता. लाच स्विकारताना संबंधितांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या कारवाई नंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात खळबळ उडाली.

रात्री उशीरापर्यंत केलेल्या  चौकशी नंतर ताडकळस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नसल्याची सर्वसामान्यांची तक्रार आहे. अर्जदाराने थेट कार्यालयाशी संपर्क साधल्यास कोणताही प्रतिसाद दिला जात नाही मात्र दलालाच्या माध्यमातून सर्व कामे सुरळीतपणे पार पडतात. अशा तक्रारी सातत्याने या कार्यालयाच्या संदर्भात केल्या जातात.

Story img Loader