लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रमुख भूमिका आहे. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. पण ही योजना चर्चेत आल्याचं कारण म्हणजे या कीटमध्ये एक रबरी लिंग देण्यात आलं आहे.
सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून त्यांच्यासमोर एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. कारण आरोग्य विभागाकडून आशा वर्कर्सना या कीटचं प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितलं आहे. मात्र आता या रबरी लिंगामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. याबद्दल राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
या घटनेनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्वीट केलं. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? आशांचे हक्काचे करोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज करोनाची तिसरी लाट दररोज ओसरली असली तरी ती देण्यात आलेली नाही.’ असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.