पालकांच्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थी लसीकरणापासून वंचित

विषाणूजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे हाती घेण्यात आलेल्या गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांच्या पालकांनीच विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

रत्नागिरी शहर आणि जिल्ह्य़ातील मिळून एकूण ५६ शाळांमध्ये आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना हा नकार मिळाला असून त्यामुळे या शाळांमधील एकाही विद्यार्थ्यांला लस टोचण्यात आलेली नाही. त्यात काही अंगणवाडय़ांचाही समावेश आहे. या विरोधामुळे सुमारे पंधरा ते वीस हजार मुले लसीकरणापासून वंचित राहिली आहेत.

गोवर व रुबेला हे दोन्ही विषाणूजन्य, वेगाने पसरणारे आजार आहेत. त्यावर कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. त्यामुळे त्यांना केवळ लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर बालपणीच प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने शासनातर्फे गोवर रुबेला मोहिमेचे धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील शाळेतील मुले व मुली, अंगणवाडीतील मुले व मुली व शाळाबाहय़ मुले व मुलींना  लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्य़ात एकूण ३ लाख ६ हजार ७३७ मुले असून, त्यांच्यासाठी ७ हजार १८४ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागात २ लाख ५५ हजार ७९ मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते त्यापकी २ लाख ३३ हजार ९२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.  त्यामुळे ९१.७१ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. त्या तुलनेत शहरी भाग लसीकरणाच्या बाबतीत पिछाडीवर राहिला. शहरी भागात ५१ हजार ६५८ पकी ३६ हजार ३०९ मुलांना लस टोचण्यात आली. याची एकूण टक्केवारी ७०.२९ एवढी आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आठल्ये यांनी या संदर्भात ‘लोकसत्ता’ला सांगितले की, या शाळांमध्ये पालकांच्या बठका घेऊन लसीकरणाची गरज समजावून सांगण्यात आली. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वेळोवेळी जिल्हास्तरावर बठका घेऊन आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल आणि मी स्वत रत्नागिरी शहरातील मेस्त्री हायस्कूल आणि मिरकरवाडा नगरपालिका शाळेमध्ये पालक सभांना उपस्थित राहून पालकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही त्यांना यश आलेले नाही. याचबरोबर आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील पालकांनी चांगला प्रतिसाद देत आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घेतले.

चुकीच्या संदेशाचा परिणाम..

समाजमाध्यमांवर अनेक चुकीचे संदेश व्हायरल होत होते. त्यातून निर्माण झालेल्या गरसमजामुळे काही शाळांमध्ये पालकांनी लसीकरणाला विरोध केला. यापकी बहुतांश शाळा उर्दू माध्यमाच्या किंवा मदारसा आहेत. विविध पातळ्यांवरून प्रयत्न करूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पण  या विरोधाचे कारणही स्पष्टपणे बोलत नसल्यामुळे गरसमज दूर करणे आणखी कठीण झाले आहे.

Story img Loader