कराड : राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नसून, दोनशे आमदार असतानाही ते याबाबतचे बिल पास करू शकत नाहीत. त्यामुळे हे सरकार केवळ चालढकल करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला देशात पहिल्या नंबरवर नेण्याची क्षमता असणाऱ्यालाच संधी मिळावी. मी केवळ महिला खासदार नाही, तर खासदार असल्याची टिप्पणी सुळे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कराडमध्ये माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके, अमित शाहांची बोचरी टीका

खासदार सुळे म्हणाल्या, राज्यात महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे. दूध, कापूस, सोयाबीन, कांदा आदी शेतमालाला दर नसल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडायचे सरकारने ठरवले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचे ११८ कोटी रुपये सरकारने निकृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी वापरल्याचा आरोप ‘आरएसएस’ने त्यांच्या वृत्तवाहिनीवर केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची गरज होती, ती त्यांनी केले नाही. प्रशासन व्यवस्थित काम करीत नसून, शेतकरी, महिलांचे प्रश्न, वाढती गुन्हेगारी भयंकर बनली आहे. राज्यातील सर्वाधिक गुन्हेगारी आज पुण्यात दिसत आहे. ज्या-ज्यावेळी भाजप सरकार आले, त्या-त्यावेळी गुन्हेगारी वाढल्याची केंद्राची आकडेवारी सांगते, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

यशवंतरावांची देशात ओळख

गुरुपौर्णिमेनिमित्त चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेत. एक आदर्श गुरू, सुपुत्र, पती, सहकारी, कवी, लेखक व द्रष्टा नेता म्हणून त्यांची देशात ओळख आहे. त्यांनी शुन्यातून विश्व निर्मिले. त्यांच्या विचारांवरच आम्ही मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास सुळे यांनी दिला.

हेही वाचा – उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदेंच्या पराभवाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, राज्यकर्त्यांनी आमचा पक्ष, चिन्ह, आमदार अन् खासदारही नेल्यामुळे आमची ताकद अपुरी पडली. माझ्या बारामती मतदारसंघात तर सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, कारखाने, दूधसंघही नेले. त्यामुळे आम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी लढत होतो. सत्ता, यंत्रणा त्यांची. कुठून कुठून मिळालेला निधीही त्यांचा. आमच्याकडे फक्त कष्टकरी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनताही पाठीशी होती. बारामतीआधी साताराची जागा जिंकण्याची खात्री होती. दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारी चिन्हात साम्य असल्याने घोळ झाला. अशीच दिंडोरीला दीड लाख मते गेली. सरकारने रडीचा डाव खेळला. परंतु, साताराच्या पराभवाबाबत आत्मचिंतन केले पाहिजे. हा पराभव वेदनादायीच असल्याची सल सुळे यांनी बोलून दाखवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rulers are not serious about reservation issues says supriya sule ssb