राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यातील काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे.
कोणत्या नियमांत केले बदल?
वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६० वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. आता ही वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. तर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे.
३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलैपासूनचा आर्थिक लाभ दिला जाईल. या योजनेतील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून त्याऐवजी एक वर्षापूर्वीची शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालेल. परराज्यातील महिलांनी राज्यात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत लग्न केले असेल तर अशा बाबतीत सदर महिलेच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रमाणे २.५ लाख मर्यादेत उत्नन्नाचा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे, त्यांना उत्पनाच्या दाखल्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी (बीपीएल) उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती (Documents for Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme)
- आधार कार्ड,
- मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- रेशन कार्ड,
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका,
- बँकेचे पासबूक,
- मोबाईल क्रमांक,
- पासपोर्ट साईज फोटो,
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? (How to Apply for Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme)
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी
- शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.
१ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६० वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत.
हेही वाचा >> …तर ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही
दरमहा १५०० रुपये
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बैंक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे१५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.