मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाडय़ाच्या विविध प्रश्नांसंदर्भात रविवारी (ता. १६) औरंगाबादला होणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकाराबाबत मराठवाडय़ातील अनेक सत्ताधारी आमदारांमध्ये खदखदत असलेला असंतोष या परिषदेत उफाळून येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या कारभारावर नाराज असलेले मराठवाडय़ातील अनेक सत्ताधारी आमदार ‘मजविप’च्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. बैठकीत मराठवाडय़ाची उपेक्षा करणाऱ्या आघाडी सरकारवर हल्लाबोल होण्याची शक्यता आहे.
मराठवाडय़ातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती ‘मजविप’चे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी दिली. या बैठकीच्या निमित्ताने चव्हाण समर्थकांची मांदियाळी औरंगाबादला लोटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
‘मजविप’ने दोन-अडीच महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये अधिवेशन भरविले होते. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना पाचारण करूनही गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, भास्करराव खतगावकर, रजनी सातव यांनी त्याकडे पाठ फिरविली होती, परंतु गेल्या दोन-अडीच महिन्यांत बऱ्याच घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणूक आणखी किमान सहा महिने लांब असली तरी एका नामांकित संस्थेच्या सहकार्याने एका मराठी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. राज्यात आपलेच सरकार असूनही कामे होत नाहीत, अशी सत्ताधारी आमदारांची भावना झाली असून, याच मुद्दय़ावर नांदेडचे आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांसमोरच राजीनामा देण्याची धमकी दिली होती.
औरंगाबादेतील नियोजित राष्ट्रीय विधी विद्यापीठासंदर्भात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्रांगडे करून ठेवले. या मुद्दय़ावर अशोक चव्हाण बरेच अस्वस्थ होते. आपण काही बोललो तर त्याचे वेगळे अर्थ लावले जातात, याचा अंदाज घेऊन त्यांनी जाहीर प्रतिक्रिया टाळली होती. नांदेडसोबत लातूरलाही विभागीय आयुक्तालय करा, अन्यथा लोकसभेच्या या दोन्ही जागांचे काही खरे नाही, असे खुद्द चव्हाण यांनी महसूलमंत्र्यांना अलीकडेच निक्षून सांगितले होते, हे उल्लेखनीय.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे विलासरावांच्या पश्चात लातूर जिल्ह्य़ाचीही उपेक्षा केली जात आहे. मराठवाडय़ाच्या विकासासंबंधी सर्वपक्षीय आमदारांची बैठक ‘मजाविप’ आणि स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था यांनी प्रथमच संयुक्तपणे आयोजित केली आहे.
अशोक चव्हाण समर्थक अस्वस्थ
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आतापर्यंत संयम बाळगत पक्षनिष्ठा जोपासण्याची घराण्याची परंपरा राखली आहे, तरी नांदेड जिल्ह्य़ातील रखडलेले काही प्रकल्प, विभागीय आयुक्तालयाचा तिढा या मुद्दय़ांवर ते व त्यांचे समर्थक आमदार अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांनी नांदेड शहराशी संबंधित काही योजना लटकविण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला. तेव्हा चव्हाण समर्थक आमदार आक्रमक झाले होते. आता विमानतळ विस्तारीकरणाची भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने चव्हाण समर्थकांची डोकेदुखी वाढली आहे.