अहिल्यानगरः श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १२ सदस्यांनी बाजार समितीने केलेली कामे निकृष्ठ आणि नियमबाह्य असल्याने त्याची देयके अदा करू नये, असे लेखी पत्र आज, शनिवारी दिले. त्यामुळे बाजार समितीत सत्ताधारी ससाणे गट अल्पमतात आला आहे. विशेष म्हणजे यात मंत्री राधाकृष्ण विखे गट व माजी आमदार  भानुदास मुरकुटे गटाच्या ४ संचालकांचा समावेश आहे. विखे आणि मुरकुटे गटाच्या १० संचालकांनी एकत्रित येत घेतलेल्या भूमिकेने मुरकुटे-ससाणे युतीला धोका निर्माण झाल्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या निवडीवेळी मुरकुटे यांचे संचालक तटस्थ राहिल्याने एकप्रकारे ससाणे गटाला त्यांची मदत होऊन ससाणे गटाचे सुधीर नवले हे चिठ्ठी काढून सभापती झाले. तेव्हापासून ससाणे गटाची बाजार समितीवर सत्ता आहे. आज समितीच्या मासिक सभेच्यावेळी १२ संचालकांनी सभापती तसेच प्रभारी सचिवांना निवेदन देवून झालेली कामे नियमबाह्य व निकृष्ठ असल्याचा आक्षेप घेतला. 

सभेच्या विषयपत्रिकेवरील श्रीरामपूरच्या कांदा मार्केटमधील काँक्रिटीकरण तसेच बेलापूर उपबाजार भुसार आवारातील रस्ता कॉक्रिटीकरण या कामाच्या देयकांना १२ संचालकांनी विरोध करत, शासनाच्या निकषाचे पालन न करता या निविदा प्रक्रिया राबवल्या तसेच स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय बांधकाम सुरू केले. त्यातील अटी व शर्तीचे पालन केले नाही. गुणवत्ताची काळजी घेतली नाही तसेच बांधकाम साहित्यांची चाचणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून झाली नाही. कार्यारंभ आदेशापूर्वी सुधारित विकास आराखड्यात मंजूरी घेतली नाही. हे विषय विषयपत्रिकेवर घेण्यासाठी चर्चा झाली नाही, बेकायदा मंजूरी देवून इतिवृतात नोंद घेण्यात आली. ही कामे निकृष्ठ व अपूर्ण असताना सभापती व प्रभारी सचिवांच्या बेकायदा देयके अदा करण्यास विरोध असल्याचे या पत्रात १२ संचालकांनी म्हटले आहे. 

हा विषय नामंजूर करावा व देयके अदा करण्यात येवू नये, त्याची इतिवृतात नोंद घ्यावी, असेही या १२ संचालकांनी म्हटले आहे. या पत्रकावर अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार, सुनील शिंदे, गिरीधर आसने, सरला बडाख, किशोर बनसोडे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, मयुर पटारे, दिपक हिवराळे, जितेंद्र गदिया आदींच्या सह्या आहेत.

विखे-मुरकुटे गट एकत्र

बाजार समितीच्या १८ पैकी १२ संचालकांनी प्रभारी सचिवाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेवून विरोध केल्याने ससाणे गटाचे सभापती सुधीर नवले हे अल्पमतात आले आहेत. सभापती निवडीपासून बाजार समितीत राजकीय खदखदत आहे. आज अखेर ही खदखद चव्हाट्यावर आली. आज दुपारी विखे-मुरकुटे गटाच्या १० संचालकांच्या बैठकीत यापुढे एकत्रित काम करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. विखे-मुरकुटे गटाच्या युतीचे चित्र निर्माण झाल्याने ससाणे गट अल्पमतात आलाच आहे परंतु, विखे-मुरकुटे गटाच्या १२ संचालकांनी अचानक घेतलेल्या भूमिकेने अशोक कारखान्याच्या निवडणुकीत झालेली मुरकुटे-ससाणे युती धोक्यात आल्याची चर्चा होत आहे.