औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा ताफा अडवून त्यांच्या क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्यालयावर दगडफेक केल्याची अफवा रविवारी (१२ जून) सायंकाळी शहरात पसरली. मात्र, या दोन्ही घटनांचे क्रांती चौक पोलिसांनी खंडण केले. “डॉ. कराड हे गोव्यात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,” अशी माहिती क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली.
दरम्यान, एका तरुणाला तीन ते चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव सचिन डोईफोडे असं आहे. सचिन डोईफोडे यानेच चार दिवसांपूर्वी भाजपाच्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांच्या यादीत पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यालयासमोर घोषणा दिल्या होत्या.
हेही वाचा : भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत : संजय राऊत
भाजपा कार्यालयासमोर घोषणा दिल्या तेव्हा मुंडे समर्थक सचिन डोईफोडे याच्यासह तिघांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या घटनेत डोईफोडेने घातलेला गोंधळ आणि मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी दिली.