यंदा एकूण ३२ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जागतिक स्तरावर विविध क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत नियुक्त्या देण्याच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या विविध विभागांत ३२ खेळाडूंना थेट नेमणुका मिळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणारी धावपटू ललिता बाबर, कुस्तीगीर राहुल आवारे, पॉवरलिफ्टर अमित उदय निंबाळकर यांचा यामध्ये समावेश आहे.

रिओ ऑलिम्पिक गाजविणाऱ्या धावपटू ललिताची उपजिल्हाधिकारीपदी, तर राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या राहुल आवारे यांची जिल्हा पोलीस उपअधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अमित निंबाळकर याची नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांसह आणखी ३२ खेळाडूंच्या थेट नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

अन्य खेळाडूंच्या नियुक्त्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागात तालुका क्रीडा अधिकारी, लिपिक, शिपाई या पदांवर करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या सर्व नियुक्त्यासंबंधीचा बुधवारी शासन आदेश जारी केला आहे.

६०० खेळाडूंना नोकऱ्या

विविध क्रीडा स्पर्धामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना शासकीय-निमशासकीय सेवेत ५ टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धामध्ये मजल मारताना खेळाडूंचे आपोआपच शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. त्याचा विचार करून राज्य सरकारने समांतर आरक्षणाची तरतूद केली. त्यानंतर अशा खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्त्या देण्याचेही धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सहाशेहून अधिक खेळाडूंना शासकीय नोकऱ्या मिळाल्या आहेत. यंदा एकूण ३२ खेळाडूंच्या थेट नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Runners lalita babar deputy collector wrestler rahul aware appoint dsp
Show comments